लातूर - सत्तेवर येताच महाविकास आघाडीने संपूर्ण कर्जमाफीचा निर्णय घेतला होता. मात्र, अनेक शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नाही, असा दावा भाजपाचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार रमेश कराड यांनी केला. शेतकऱ्यांना मदत मिळावी, अशी मागणी करणारे निवेदन आमदार कराड यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा त्यांनी आरोप केला.
चार महिन्यांचा कालावधी लोटला तरी, शेतकऱ्यांना त्याचा प्रत्यक्ष लाभ मिळालेला नाही. ऐन पेरणीच्या दरम्यान शेतकऱ्यांना मदतीचा हात देणे गरजेचे होते, असे आमदार रमेश कराड यांनी म्हटले आहे.
राज्य सरकारने केलेल्या घोषणांची अंमलबजावणी केली नसल्याच्या निषेधार्थ भाजपातर्फे राज्यभर आंदोलने करण्यात येत आहेत. लातूर येथे जिल्हाध्यक्ष तथा आमदार रमेश कराड व शहराध्यक्ष गुरुनाथ मगे यांनी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांना दिले. यावेळी कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे मोजकेच पदाधिकारी उपस्थित होते.
सरकारकडून कर्जमाफीची घोषणा करण्यात आली. मात्र, घाईगडबडीत घेतलेल्या निर्णयाची आता अंमलबजावणी होत नाही. खरिपाची पेरणी सुरू आहे. शेतकऱ्यांना या हंगामाच्या तोंडावर पैसे पदरी पडतील, अशी आशा होती. मात्र, राज्य सरकारने दुर्लक्ष केले आहे. ही कर्जमाफी फसवी असल्याचा आरोप भाजपाकडून होत आहे.