लातूर- आधीच दुष्काळाने होरपळलेल्या निलंगा तालुक्यातील भुतमुगळी गावातल्या एका शेतकऱ्यावर संकट कोसळले आहे. अज्ञात व्यक्तीने गोठ्याला लावलेल्या आगीत एक गाय जागीच ठार तर दोन बैल गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. विठ्ठल उनसनाळे असे त्या आपत्तीग्रस्त शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेमुळे दुष्काळात तेरावा अशी गत उनसनाळे कुटुंबीयांची झाली आहे.
निलंगा तालुक्यातील भुतमुगळी येथील शिवारात विठ्ठल उनसनाळे यांची नऊ एकर जमीन आहे. शनिवारी सांयकाळी नेहमीप्रमाणे उनसनाळे हे दोन बैलांसह एक गायीला गोठ्यात बांधून घरी गेले होते. मध्यरात्री अज्ञात व्यक्तीने त्यांच्या गोठ्याला आग लावली. या दुर्घटनेत त्यांची गाय जळून जागीच ठार झाली. तर दोन बैल भाजल्यामुळे गंभीर जखमी झाले आहेत. यामुळे या शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
शिवाय गोठ्यात ठेवलेले शेतीपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे. यामध्ये फवारा स्प्रिंक्लरचे ४० पाईप, पेरणी यंत्र, विद्युत मोटार असे साहित्य जळालेआहे. याबाबत तलाठी डी.टी.जाधव व मंडळ अधिकारी जी.आर खुरदे यांनी पंचनामा केला. या प्रकरणी कासार शिरसी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
हेही वाचा- लातुरात रेल्वेने पाणी आणल्याचे बील पालिकेच्या माथी, मदत केल्याचे बील कसे मागता - आमदार अमित देशमुख