निलंगा (लातूर)- शेतातील कॅनलमधील बिघडलेली मोटार बाहेर काढण्यासाठी गेलेल्या 24 वर्षीय युवकाचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला आहे. अमोल बंकट सातभाई असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
तरूण शेतकरी अमोल बंकट सातभाई हा दिनांक 6 रोजी आपल्या शेतातील नाल्यातील बिघडलेली विद्युत मोटार पाण्याबाहेर काढत होता. त्यादरम्यान अचानक विद्युत संचार सुरू झाला व विजेचा धक्का बसून अमोल याचा जागीच मृत्यू झाला.
अमोलला शेतात असलेल्या त्याच्या नातेवाईकांनी बाहेर काढले, मात्र तोपर्यंत भरपूर वेळ गेला होता. अमोलच्या पश्चात त्याची आई, वडील व भाऊ असा परिवार आहे.
अमोलचे शवविच्छेदन हुलसूर येथील आरोग्य केंद्रात करण्यात आले असून त्याचा मृतदेह अंत्यसंस्कार करण्यासाठी नातेवाईकांच्या तब्यात देण्यात आला आहे. याबाबत हुलसूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.