लातूर - देवदर्शनासाठी लातूरहून हरियाणातील हिसारकडे निघालेल्या भाविकांच्या मिनीबसला राजस्थानमधील नागोर जिल्ह्यात आज (शनिवार) पहाटे अपघात झाला आहे. या अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला असून त्यापैकी 5 जण हे लातूर जिल्ह्यातील औसा शहर आणि तालुक्यातील याकतपूर येथील तर 1 जण उस्मानाबाद जिल्ह्यातील आहेत.
अपघातग्रस्त मिनीबस राजस्थान येथील नागोर जिल्ह्यातून जात असताना अचानक रस्त्यात जनावरे आडवे आली. यामध्ये बस चालकाचे नियंत्रित सुटले. त्यामुळे मिनीबस झाडावर आदळून अपघात झाला. या अपघातात एकूण 12 जणांचा मृत्यू तर १० जण जखमी झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यानंतर लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत हे नागोरचे जिल्हाधिकारी दिनेश कुमार यादव यांच्या संपर्कात आहेत. यामध्ये औसा तालुक्यातील 5 जणांचा मृत्यू झाल्याच्या घटनेला जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी दिला आहे.
यामध्ये याकतपूर येथील भगवान बोबडे (वय 50 वर्षे), सुमित्रा सांगवी (वय 35 वर्षे), मयुरी बोबडे (वय 18 वर्षे), गोविंद चाळक (वय 28 वर्षे), सिद्धी सांगवे (वय 9 वर्षे), सिद्धी सागवे (वय 9 वर्षे), सुतार आडनाव असलेली 55वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. तर कर्नाटक येथील श्यामजी गायकवाड, बलीराम, रामप्रसाद, शिवप्रसाद ठाकर, सालूबाई चिलाईबाडी आणि सुप्रिया बालाजी (रा. उस्मानाबद) यांचा मृतांमध्ये समावेश आहे. तर १० भाविकांवर कुचमन येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अपघाताविषयी अधिक माहिती आणि मदती संबंधी त्यांच्यात संपर्क सुरू आहे. मृतांची नावे आणि त्यांची माहिती घेण्याचे काम सुरू आहे. या घटनेमुळे याकतपूर गावावर शोककळा पसरलेली आहे.