लातूर - लोकसभा निवडणुकीदरम्यानच्या आदर्श आचारसंहितेच्या काळात उदगीर शहर व उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यातील 4 पोलिसांनी एका व्यापार्याकडून दीड लाख रुपये लूटले होते. याप्रकरणी या पोलिसांना पोलीस अधिक्षकांनी बडतर्फ केले होते. आतापर्यंत तुरुंगात असलेल्या या चारही बडतर्फ पोलिसांना उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने मंगळवारी जामीन मंजूर केला आहे.
उदगीर येथील सोन्याचे व्यापारी बालाजी चन्नावार हे 1 एप्रिल रोजी दुकानातील 6 लाखांची रक्कम घरी घेऊन जात होते. त्यावेळी शिवाजी चौक येथे शहर पोलीस ठाण्यातील कॉन्सटेबल श्रीहरी डावरगावे, खेळगे, बडे व ग्रामीण पोलीस ठाण्यातील पोलिस कॉन्सटेबल रमेश बिर्ले यांनी त्यांना अडवून बॅगेची झडती घेतली व सदर रक्कम जप्त करण्याची धमकी देत त्या रक्कमेतील दीड लाख रुपयांची रक्कम काढून घेतली होती. याची व्यापाऱ्यांने उदगीर पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या तक्रारीवरून पोलीस कर्मचार्यांवर गुन्हा दाखल करून त्याच दिवशी त्यांना अटक करण्यात आली होती. शिवाय पोलीस अधिक्षकांनी तत्काळ त्यांना बडतर्फ केल्याचे आदेश पारीत केले होते. याप्रकरणी या पोलीस कर्मचार्यांनी उदगीरच्या जिल्हा सत्र न्यायालयाकडे जामीनासाठी अर्ज केला. मात्र, सत्र न्यायालयाने त्यांचा अर्ज नामंजूर केला होता. त्या दिवसांपासून पोलीस कर्मचारी अटकेत होते.
त्यानंतर या बडतर्फ पोलिसांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जामीनासाठी अर्ज केला होता. सदर अर्जावर सुट्टीतील न्यायमूर्ती एस. एम. गव्हाणे यांच्यासमोर 14 मे रोजी सुनावणी झाली. दरम्यान, आरोपी पोलिसांच्या वतीने अॅड. व्ही. डी. गुणाले यांनी बाजू मांडली व आरोपी पोलिसांवर कलम 392 प्रमाणे दाखल केलेला गुन्हा चुकीचा आहे. संबंधित व्यापारी रक्कम परत केल्याचेही सांगतो. मात्र, पोलीस कर्मचारी हे संबंधित घटनास्थळावर उपस्थितच नव्हते. हे निदर्शनास आणून दिल्याने खंडपीठाने त्या बडतर्फ पोलीस कर्मचार्यांची जामीनावर सुटका केली आहे.