लातूर : पुणे-मुंबई यासारख्या शहरांमध्ये दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे या ठिकाणी कामानिमित्त असलेल्या नागरिकांनी 'गड्या आपला गाव बरा' म्हणत घरवापसी केली आहे. यामध्ये 18 हजार लोक शहरातून गावाकडे दाखल झाले आहेत. तर २१ जण हे परदेशातून गावी परतले आहे. या गावी परतलेल्या लोकांची नोंद घेतली जात आहे. मात्र, हे लोक स्वतःहून पुढे येत नसल्याने या लोकांची तपासणी करण्याचे आव्हान जिल्हा प्रशासनासमोर आहे.
लातूर जिल्ह्यात आतापर्यंत एकही कोरोनाग्रस्त रुग्ण आढळलेला नाही. जिल्हा प्रधासनाची यंत्रणा सज्ज असली, तरी सर्वसामान्य नागरिक मात्र नियमांचे पालन करताना दिसत नाहीत. पुण्या- मुंबईहून येणाऱ्या नागरिकांनी गावात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडे देण्याचे अनिवार्य असतानाही याकडे दुर्लक्ष केले जात आहे. अशा नोंदणीसाठी 'आशा' वर्कर्स काम करत आहेत. त्यानुसार १८ हजार लोकांची नोंदणी करण्यात आली आहे. यापैकी 55 जण संशयित आहेत. पैकी 32 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून सर्व रिपोर्ट हे निगेटिव्ह आले आहेत.
हेही वाचा - अक्षता पडताच नवरा-नवरीवर गुन्हा, नियमाचे उल्लंघन केल्याने कारवाई
शहरातील नागरिक ग्रामीण भागात आल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे अशा नागरिकांनी तपासणी करून गावात प्रवेश करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र, प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी केली जात नाही. त्यामुळे अशा संशयितांना शोधून त्यांची तपासणी करण्याचे आव्हान जिल्हा प्रशासनासमोर आहे. गावकडे परतलेल्या नागरिकांच्या तपासणीसाठी एका वैद्यकीय अधिकाऱ्याची नेमणूक केली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी सांगितले आहे.
- पत्रकार परिषदही एक मीटर अंतरावरून -
कोरोनाला आळा घालण्यासाठी सध्या जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार आज (सोमवारी) जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, पोलीस अधीक्षक डॉ. राजेंद्र माने, वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, अप्पर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे यांची पत्रकार परिषद पार पडली. यामध्येही अधिकाऱ्यांनी एकमेकांमध्ये 1 मीटरचे अंतर ठेवले होते. त्यामुळे आपण सर्वांनीही जागरुक असणे गरजेचे असल्याचेही जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी सांगितले.
हेही वाचा - लातुरात शुकशुकाट; जनता कर्फ्यूला लातूरकरांचा मोठा प्रतिसाद