कोल्हापूर - शेतजमिनीच्या वादातून करवीर तालुक्यातील आरडेवाडी येथे रविवारी विळा व काठ्यांनी झालेल्या मारामारीत गंभीर जखमी झालेल्या एका तरुणाचा सोमवारी उशिरा मृत्यू झाला. आदिनाथ गोपीनाथ वाकरेकर (वय २२), असे मृत तरुणाचे नाव आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. या प्रकरणातील तिघे संशयित अद्याप फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे आरडेवाडी येथे तणावाचे वातावरण असून गावामध्ये पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, करवीर तालुक्यातील उपवडेपैकी आरडेवाडी येथे रविवारी दोन कुटुंबात वडिलोपार्जित शेतामध्ये गवत कापण्याच्या कारणावरून राडा झाला होता. त्यात दोन्ही गटातील मिळून १६ जण जखमी झाले होते. त्यापैकी आदीनाथ वाकरेकर हा देखील गंभीर जखमी झाला होता. त्याचा उपचारादरम्यान रात्री मृत्यू झाला आहे. याबाबत करवीर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा सुद्धा नोंद करण्यात आला आहे.
या हल्ल्यातील अजित वाकरेकर, अमित वाकरेकर व अंकुश वाकरेकर हे तिघे संशयित अद्यापही फरारी असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. दरम्यान या प्रकरणी दोन्ही गटातील 8 जणांना अटक केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.