कोल्हापूर - जिल्ह्यातील गिरगावमध्ये सापाने दंश केल्यामुळे एका तरुणाचा मृत्यू झाला. मात्र, त्याला सीपीआर रुग्णालयात दाखल केले असता रुग्णालयातील डॉक्टरांनी योग्य उपचार केले नाही. त्यामुळेच या तरुणाचा मृत्यू झाला असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.
प्रताप पुणेकर, असे मृताचे नाव आहे. तो गिरगावमधील रहिवासी असून तो स्पर्धा परीक्षेची तयारी करीत होता. गेल्या ८ जुलैला तो शेतातून घरी येत असताना त्याला सापाने दंश केला. त्यानंतर त्याला सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी त्याच्यावर योग्य उपचार केले नाही. त्यामुळेच त्याचा गेल्या १० जुलैला मृत्यू झाला असल्याचे आरोप गावकऱ्यांनी केला आहे. शिवाय गावकऱ्यांनी आज प्रतिकात्मक साप घेऊन सापीआर रुग्णालयावर मोर्चा काढला. तसेच सीपीआर प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले.
गावकऱ्यांनी मोर्चा काढल्यानंतर सीपीआरच्या अधिकाऱ्यांनी चौकशी समिती स्थापन केली. त्यानंतर सीपीआरमध्ये व्हेंटिलेशनची कमतरता असल्याची कबुली सीपीआरच्या अधिष्ठतांनी दिली.
दरम्यान प्रतापच्या मृत्यूला सीपीआरचे डॉक्टरच जबाबदार असून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी गावकऱ्यांनी यावेळी केली. तसेच केवळ व्हेंटिलेशन कमतरतेमुळे नागरिकांवर उपचार होणार नसतील. त्यामुळे नागरिकांचे जीव जाणार असतील तर भल्यामोठ्या सीपीआरचा उपयोग काय? असा प्रश्न केला जात आहे.