कोल्हापूर - गेल्या 77 दिवसांपासून कोल्हापूरच्या वैभवातील एक महत्वाची वास्तू असलेल्या जयप्रभा स्टुडिओ समोर अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ तसेच बचाव कृती समितीच्या वतीने ( Save Jayprabha Studio Agitation ) बेमुदत आंदोलन सुरू आहे. कडक उन्हात सुद्धा या आंदोलनस्थळी अनेक नाट्यकर्मी ठाण मांडून असून, आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. मात्र, 77 दिवसांपासून सरकारकडून आंदोलनाची दखल घेतली नाहीये. त्यामुळे आंदोलक सुद्धा आता आक्रमक झाले आहेत. ज्या स्टुडिओमध्ये खऱ्या अर्थाने मराठी चित्रपटाची मुहुर्तमेढ रोवली गेली. त्याचा प्रश्न मिटत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे आंदोलकांनी म्हटले आहे.
सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा - दरम्यान, जयप्रभा स्टुडिओ विक्री झाल्याची बातमी बाहेर पडताच संपूर्ण कोल्हापूरातील नागरिकांमधून संतापाची लाट पाहायला मिळाली. गेल्या अनेक वर्षांपासून भालजी पेंढारकर यांचा हा स्टुडिओ वाचला पाहिजे, अशी अनेकांची भावना होती. मात्र, स्टुडिओ विक्रीच्या माहितीनंतर स्टुडिओ बचाव कृती समिती तसेच अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे सर्वच कलाकार मंडळी आक्रमक झाली. तेव्हापासून स्टुडिओ बाहेरच बेमुदत आंदोलन सुरू आहे. पण, आज ( 30 एप्रिल ) आंदोलनाचा 77 वा दिवस आहे, तरीही या आंदोलनाची सरकारने दखल घेतली नाहीये. त्यामुळे आता आम्हाला सामूहिक आत्मदहन करण्याशिवाय पर्याय नसल्याचे म्हणत आम्ही त्याची संपूर्ण तयारी केली असल्याचेही आंदोलक म्हणाले. त्यामुळे राज्य सरकारने योग्य तो तोडगा काढून हा स्टुडिओ वाचवावा, अशी विनंतीही त्यांनी केली आहे.
माजी आमदारांची मुले खरेदीत सामील - हा स्टुडिओ ज्या महालक्ष्मी स्टुडिओने खरेदी केला, यामध्ये माजी आमदार राजेश क्षीरसागर यांच्या दोन मुलांचा सुद्धा सहभाग आहे. क्षीरसागरांनी म्हटले की, राज्यघटनेने प्रत्येकाला जागा खेरेदी विक्रीचा अधिकार दिला आहे. माझी मुले सुद्धा सुज्ञ आहेत. एक मुलगा बीई सिव्हील झाला आहे. त्याचा बांधकाम व्यवसाय असल्याने त्याने ही जागा विकत घेण्यामध्ये सहभाग घेतला. मात्र, मी कोल्हापुरातील नागरिकांच्या भावनेचा आदर करतो. ही जागा केवळ संगीत आणि नाट्य यासाठीच वापरली जावी, हेच माझेही मत आहे. शिवाय, राज्य सरकार जर ही जागा विकत घ्यायला तयार असेल तर, केव्हाही ही जागा द्यायला तयार आहे. अथवा सरकारने आम्हाला या जागेच्या ऐवजी पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी सुद्धा क्षीरसागर यांनी केली आहे.
विक्री विरोधात दिलीप देसाईंची तक्रार - जयप्रभा स्टुडिओची विक्री झाल्यानंतर प्रजासत्ताक संस्थेचे दिलीप देसाई यांनी ही विक्री बेकायदेशीर असल्याचे म्हटले होते. त्यानंतर जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडे सुद्धा याबाबत तक्रार दिली होती. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी सह-जिल्हा निबंधक वर्ग 1, भूमी अभिलेख विभागाचे जिल्हा अधीक्षक तसेच करवीर प्रांताधिकाऱ्यांना नोटीस पाठवली आहे. यामध्ये स्वयंस्पष्ट अभिप्रायासह सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे.
क्षीरसागरांची आंदोलनस्थळी भेट - राजेश क्षीरसागर यांनी आंदोलनस्थळी भेट देत आपण सरकारला जागा द्यायला तयार आहे. आम्हाला पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केल्याचे सांगितले आहे. तसेच त्यांनी आंदोलकांना त्यांचे आंदोलन मागे घेण्याचीही विनंती केली. त्यामुळे एकीकडे क्षीरसागर यांची मागणी तसेच बेकायदेशीर विक्रीची पुढे आलेली तक्रार यानंतर पुढे काय होणार हेच पाहावे लागणार आहे.
काय आहे जयप्रभा स्टुडिओचा इतिहास ? - जयप्रभा स्टुडिओ आणि येथील एकूण 13 एकर जागा भालजी पेंढारकर यांनी विकत घेतली होती. त्यामध्ये अनेक चित्रपटांचे चित्रीकरण झाले. अनेक दिग्गज कलाकार याठिकाणी येऊन गेले. अनेकांच्या करिअरची सुरुवात या जयप्रभा स्टुडिओ मधूनच झाली. सर्वकाही ठीक सुरू होते. त्याच काळात महात्मा गांधी यांची हत्या झाली आणि त्याचे पडसाद संपूर्ण देशभर पाहायला मिळाले. याच वेळी जयप्रभा स्टुडिओ सुद्धा जाळण्यात आला. यात स्टुडिओचे प्रचंड नुकसान झाले. भालजींनी आपल्या कमाईचे सर्व पैसे जयप्रभा पुन्हा उभा करण्यासाठी लावले. शिवाय अनेक ठिकाणहून कर्जही काढले. मात्र, पुढे त्यांच्या डोक्यावर कर्ज झाल्याने शेवटी हा स्टुडिओ त्यांनी त्यांच्या जवळच्या असणाऱ्या मंगेशकर कुटुंबाला विकायचे ठरवले आणि लता मंगेशकर यांनी त्यांच्याकडून हा स्टुडिओ आणि 13 एकर जागा विकत घेतली. विकताना या ठिकाणी केवळ चित्रपट निर्मितीचे काम सुरू राहावे, अशी अट त्यांनी घातली होती. त्यानुसार चित्रपट निर्मितीचे काम सुरू राहीले. तेवढ्यात भालजी पेंढारकर यांचे निधन झाले आणि पुढे जयप्रभा स्टुडिओमध्ये चित्रपट निर्मितीचे काम सुद्धा थांबले. पुढे कित्येक वर्षे हा स्टुडिओ बंदच होता. आता हा स्टुडिओ विक्री झाल्यानंतर कोल्हापूरकरांमधून संतापाची लाट उसळली आहे. ज्या स्टुडिओमध्ये खऱ्या अर्थाने मराठी चित्रपटाची मुहुर्तमेढ रोवली गेली तो स्टुडिओ वाचला पाहिजे, अशी सर्वांची मागणी आहे.
या आहेत मागण्या -
- जयप्रभा स्टुडिओ चित्रीकरणासाठी तात्काळ खुला झाला पाहिजे.
- जयप्रभा स्टुडिओ मधील इमारतीसह खुली जागा आरक्षित रहावी व चित्रीकरण या व्यतिरिक्त त्याचा कोणताही व्यावसायिक वापर होऊ नये.
- कोल्हापूर महानगरपालिकेने जयप्रभा स्टुडिओच्या व्यावसायिकीकरण/वाणिज्य वापरासाठी परवानगी देऊ नये.
- जयप्रभा स्टुडिओ याचे जतन होण्याकरिता शासनाने व कोल्हापूर महानगर पालिकेने लक्ष घालावे.