कोल्हापूर - कोल्हापूरमध्ये गेल्या 12 दिवसांपासून पावसाने थैमान घातले आहे. त्यामुळे येथील तलाव, नदी, नाले ओसंडून वाहत आहेत. अनेक गावात पुराने रस्ते आणि पूलही पाण्याखाली गेले आहेत. पुरामुळे गावांचा संपर्कही तुटला आहे. तर अनेक ठिकाणी ग्रामस्थ पुरात अडकले आहेत. नौदलाच्या सर्व 14 पथकांनी आज सकाळी 6 वाजल्यापासून कोल्हापुरजवळील शिरोली गावात (शिरोळ ब्लॉक) बचाव कार्य सुरू केले आहे.
कोल्हापूरच्या पंचगंगा नदीची पाणी पातळी सध्या झपाट्याने कमी होत आहे. राष्ट्रीय महामार्गावरील पाण्याची पातळीसुद्धा झाली 1 फुटांनी कमी झाली आहे. तर पुणे-बंगळुरू महामार्ग लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे.
एनडीआरएफ आणि आपत्ती निवारण पथकाने युद्धपातळीवर बचावकार्य हाती घेऊन कोल्हापुरातील 824 कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलवले. आतापर्यंत 2,177 कुटुंबातील सुमारे ६ हजार ग्रामस्थांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर शिरोली येथे पुराचे पाणी वाढले असून पोलीस या नागरिकांची पुरातून सुटका करत आहेत.