कोल्हापूर- स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने दोघा सराईत मोटरसायकल चोरट्यांना अटक केली आहे. अवधूत लहू धुरे (वय २० रा. फये ता. भुदरगड) व तुळशीदास अर्जुन पाटील (वय २१ रा. भेंडवडे ता. भुदरगड) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून ५ लाख ३० हजार रुपये किमतीच्या पंधरा दुचाक्या जप्त करण्यात आल्या आहेत. अशी माहिती कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
५ लाख ३० हजार रुपये किमतीच्या १५ दुचाक्या हस्तगत
जिल्ह्यामध्ये दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. त्या अनुषंगाने या गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांनी एक विशेष पथक नेमले होते. दोन चोरटे कोल्हापूर गारगोटी रोडवरील तपोवन मैदानाजवळ चोरीतील दुचाक्या घेऊन येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने या ठिकाणी सापळा रचून अवधूत धुरे व तुलसीदास पाटील या दोघा सराईत चोरट्यांना अटक केली. त्यांच्याकडून ५ लाख ३० हजार रुपये किमतीच्या १५ दुचाक्या हस्तगत करण्यात आल्या आहेत.
धुरे हा चोरलेल्या दुचाक्या तुलसीदास पाटील यांच्याकडे विक्रीला द्यायचा
अटक करण्यात आलेला अवधूत धुरे हा चोरलेल्या दुचाक्या तुलसीदास पाटील यांच्याकडे विक्री करण्यासाठी देत होता, अशी कबुली आरोपींनी दिली आहे. दोघाही आरोपींना कोल्हापुरातील जुना राजवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ८, शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून २, राजाराम पुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून २, भुदरगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून २ व करवीर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून १, अशा १५ दुचाक्या चोरी केल्याची कबुली दिली आहे. सर्व दुचाक्या जप्त करण्यात आल्या आहेत.
दोघा चोरट्यांना २९ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली
न्यायालयाने दोघा चोरट्यांना २९ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस अधीक्षक शैलेश बळकवडे, अपर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष पोवार, सत्यराज घुले, पांडुरंग पाटील तुकाराम राजगिरे, विठ्ठल मनी कॅरी, संजय पडवळ आदींनी ही कारवाई केली.
हेही वाचा- न्यायालयात सरकारचे वकील उपस्थित राहत नाहीत, ही अतिशय गंभीर बाब - संभाजीराजे