कोल्हापूर - राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे क्रमांक ३ आणि ६ आज (गुरुवारी) सायंकाळी सात वाजता उघडले. गेल्या तीन दिवसांपासून पावसाची मुसळधार बरसात सुरू असल्याने धरणाच्या पाणी साठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे.
स्वयंचलित दरवाजातून विसर्ग सुरू झाल्याने पंचगंगा नदीच्या पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सध्या धरणाच्या स्वयंचलित दरवाजामधून १ हजार ४०० क्यूसेक तर कृत्रिम दरवाजामधून १ हजार ४०० असा एकूण २ हजार ८०० क्यूसेक इतका विसर्ग सुरू आहे.
विशेष म्हणजे स्वयंचलित दरवाजे उघडण्याची उत्सुकता कोल्हापूरकरांना लागून राहिली असते. हे दरवाजे उघडले की वर्षभराच्या पाण्याची चिंता मिटल्याचे संकेत मिळतात. मात्र, असे असले तरी कोल्हापूरकरांच्या मनात गेल्या वर्षीच्या महापुराची भीती कायम आहे. त्यामुळे यंदा कोल्हापूरकरांच्या चिंतेत भर पडली आहे.
राधानगरी धरण -
या धरणाला सात दरवाजे आहेत. भारतरत्न एम. विश्वेश्वरय्या यांनी या दरवाजाची रचना केली. धरण भरले की पाण्याचा दाब या दरवाजावर पडतो. दरवाजा आपोआप उचलला जातो. पाठोपाठ पाण्याचा विसर्ग सुरू होतो आणि धरणावरचा पाण्याचा अतिरिक्त दाब कमी होतो, अशी या स्वयंचलित दरवाजाची रचना आहे.
राधानगरी धरण म्हणजे कोल्हापूरच्या हिरव्यागार शेतीचे गमक आहे. हे धरण राजर्षी शाहू महाराजांनी बांधले नसते तर पाऊस जसा पडला असता तसा वाहून गेला असता आणि जिल्ह्याच्या पाचवीला दुष्काळ पुजला असता. मात्र, शाहू महाराजांच्या दूरदृष्टीतून 1902 मध्ये या धरणाची भोगावती नदीवर फेजिवडे येथे उभारणी सुरू झाली. असंख्य अडचणींना तोंड देत 1952 च्या आसपास धरणाची उभारणी पूर्ण झाली. पिण्याच्या, पिकासाठीच्या पाण्याची त्या वेळच्या परिस्थितीत चिंता मिटली.
या धरणाचे बांधकाम रेंगाळत झाले असले तरीही धरणाच्या पायात शिसे ओतून पाया भक्कम करण्यात आला. धरणाचे काम दर्जेदार व्हावे म्हणून खूप कसोट्या लावण्यात आल्या. शाहू महाराजांनंतर छत्रपती राजाराम महाराजांनी धरणाचे काम पूर्णत्वास नेले. दाजीराव अमृतराव विचारे यांच्या देखरेखीखाली हे काम पूर्ण झाले. आणि त्यांचे नाव या परिसरातील एका वाडीस दाजीपूर असे देण्यात आले.
कोयनेतून विसर्गापूर्वी पूर्व सूचना दिली जाईल - कुमार पाटील
गुरुवारी संध्याकाळी 6 वाजता कोयना धरणामध्ये 67.27 टीएमसी पाणीसाठा आहे. धरण परिचलन सूचीनुसार कोयना धरणातील पाणीसाठा 80 टीएमसीच्या वर गेल्या नंतरच कोयना धरणातून कोयना नदीत विसर्ग सोडण्याचा निर्णय घेतला जाईल. सध्या गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत पाऊस आणि पाण्याची आवक कमी आहे. विसर्गाबाबत प्रशासन आणि प्रसारमाध्यमे यांना पूर्वसूचना दिली जाईल, अशी माहिती कोयना सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता कुमार पाटील यांनी दिली.