कोल्हापूर : कोल्हापूरची कन्या जागतिक विक्रमवीर गिर्यारोहक अन्वी चेतन घाटगेने पुन्हा एकदा एक पराक्रम केला आहे. वय अवघे 3 वर्ष 5 महिने असताना तिने कर्नाटकातील सर्वोच्च शिखर मुल्यणगीरी सर केले आहे. एवढ्या कमी वयात तिने हे शिखर सर केले असल्याची नोंद झाली आहे. तिच्या या कामगिरीनंतर आता सर्वच स्तरातून तिचेे कौतूक होत आहे.
उंची समुद्रसपाटीपासून 1930 मीटर उंच : मुल्यनगिरी ट्रेक हा शिखरापर्यंतचा 3-4 किमी अंतरावर आहे. चढण्यासाठी सुमारे 3 तास लागतात. ट्रेकचा सुरुवातीचा भाग चढा म्हणजेच 60 अंश किंवा त्याहून अधिक कललेला आहे. चढाईस अत्यंत अवघड आणि कठीण असलेला ट्रेक हा सुरुवातीस झुडपे आणि घनदाट झाडांनी व्यापलेला आहे. काही काळानंतर, पायवाट डोंगराच्या बाजूने अधिक तीव्र आणि अवघड होते. अन्विने भर उन्हात व अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत हा ट्रेक केवळ अडीच तासात पूर्ण केला. मूल्यनगिरी शिखरावर पोहोचल्यानंतर अन्विने राजमाता जिजाऊ यांना अभिवादन केले.
अन्वी घाटगे ठरली पहिली गिर्यारोहक : अन्वी चेतन घाटगे वय 3 वर्षे 5 महिने हिने 12 जानेवारी राजमाता जिजाऊ यांची जयंती आणि याच जयंतीचे औचित्य साधून कर्नाटकचे सर्वोच्च शिखर मुल्यणगीरी जो समुद्रसपाटीपासून 1930 मीटर उंच आहे तो सर केला आहे. या मोहिमेकरता तिची आई-अनिता व वडिल चेतन घाटगे यांच्यासोबत दिनांक 11 जानेवारी 2023 रोजी कोल्हापूर येथून रवाना झाले होते. अन्वीने 12 जानेवारी 2023 रोजी आई-अनिता घाटगे, वडील चेतन घाटगे, मामा रोहन माने , हर्शदा माने, चिकमंगलूर फॉरेस्ट विभागाचे फॉरेस्ट गार्ड उमेश यांच्यासोबत दुपारी मुल्यानगीरी शिखराच्या पायाथ्याशी असलेल्या सर्पदारी या ठिकाणापासून शिखर चढाईला सुरुवात केली. कर्नाटकातील मूल्यनगीरी हे शिखर सर करणारी अन्वी ही देशातील पहिली व सर्वात लहान गिर्यारोहक ठरलेली आहे. त्याबाबत कर्नाटकचे उपवनसंरक्षकांनी सुद्धा तिचे अभिनंदन करून याबाबतचे प्रमाणपत्र देऊन तिचा सन्मान केला आहे.
यापूर्वी कळसुबाई शिखर सर : यापूर्वी कुमारी अन्वी हिने वयाच्या 2 वर्षे 11 महिन्याची असताना महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसुबाई हे सर केले आहे. या पराक्रमाचे इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, अशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झालेली आहे. नुकतेच वर्ल्ड रेकॉर्ड कमिटीने तिला एंगेस्ट माऊंटनर हा किताब देऊन सन्मानित केले आहे. तसेच तिने किल्ले पन्हाळगड, किल्ले पावनगड, किल्ले विशाळगड, शिवगड, सामानगड, किल्ले पारगड, किल्ले रांगणा किल्ला वल्लभगड, असे अनेक किल्ले तसेच अतिशय खडतर व कठीण समजला जाणारा किल्ले वासोटा हा अवघ्या दीड तासात सर केलेला आहे.
हेही वाचा : Mega Block In Mumbai मुंबईत आज रेल्वेच्या हार्बर आणि ट्रान्सहार्बर मार्गावर मेगा ब्लॉक, प्रवाशांचे होणार हाल