कोल्हापूर - दहावीचा पेपर अवघड जाईल.. मला परीक्षेची भीती वाटते.. आजारी पडण्यासाठी काहीतरी औषध द्या... असा आग्रह विद्यार्थिनीने केल्यानंतर शिक्षकाने तिला पाण्यातून चक्क कीटकनाशक प्यायला दिल्याचे समोर आले आहे. यानंतर या विद्यार्थिनीला विषबाधा झाली आणि त्यातच तिचा मृत्यू झाला. निलेश प्रधाने, असे त्या शिक्षकाचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
या विद्यार्थिनीच्या मृत्यूला शाळेतील शिक्षक जबाबदार असल्याचे समोर आले आहे. सानिका माळी, असे त्या मृत विद्यार्थिनीचे नाव असून ती दहावीत शिकत होती. तिला शाळेत पिण्याच्या पाण्यातून विषबाधा झाली होती. त्यानंतर विषबाधा झाल्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान तिचा २५ फेब्रुवारीला मृत्यू झाला होता. सानिकाच्या पिण्याच्या पाण्याच्या बाटलीमध्ये अज्ञाताने विष मिळल्याचा आरोप नातेवाईकांनी केला होता. आता हा प्रकार शाळेच्या शिक्षकानेच केल्याचे समोर प्राथमिक तपासात उघड झाले आहे. यामुळे या प्रकरणाला वेगळेच वळण लागले आहे. याप्रकरणी प्रधानेला अटक झाली आहे.
दहावीचा पेपर अवघड जाईल. त्यामुळे मला आजारी पडण्यासाठी काही औषध द्या, असे सानिकाने शिक्षक प्रधानेला म्हटले होते. त्यानंतर प्रधाने याने पाण्याच्या बाटलीतून तिला कीटकनाशक दिले. ही बाब प्राथमिक चौकशीत समोर आली आहे.
शिक्षकांनी विद्यार्थ्यांना चांगले शिकवणे आणि विद्यार्थ्यांच्या मनातील परीक्षेची भीती काढून टाकण्याचे कामही त्यांनी करणे अपेक्षित असते. विद्यार्थ्यांचे पालक याच अपेक्षेने त्यांच्याकडे पाहत असतात. त्यांच्यावर विश्वासही ठेवतात. असे असताना शिक्षकाने विद्यार्थिनीच्या मनातील परीक्षेची भीती दूर करण्याऐवजी तिला विषप्राशनाचा पर्याय उपलब्ध करून देणे संतापजनक आहे. या घटनेनंतर विद्यार्थिनीच्या नातेवाईकांना मोठा धक्का बसला असून त्यांनी संबंधित शिक्षकावर कडक कारवाईची मागणी केली आहे.
काय आहे प्रकरण? -
कोल्हापुरातील शिरोळ तालुक्यातील शिरटी गावात २० फेब्रुवारीला दहावीत शिकणाऱ्या मुलीला पिण्याच्या पाण्यातून विषबाधा झाली होती. त्यानंतर तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, २५ फेब्रुवारीला तिचा मृत्यू झाला. तसेच सानिकाच्या पिण्याच्या पाण्याच्या बाटलीमध्ये अज्ञाताने विष टाकल्याचा आरोप नातेवाईकांनी केला होता. मृत्यूपूर्वी तिनेही याबाबत माहिती दिली होती. त्यामुळे संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी संतप्त नातेवाईकांनी केली होती. तसेच पोलिसांनी नातेवाईकांशी चर्चा करून मृतदेह ताब्यात घेण्याची विनंती केली होती. त्यानुसार पोलिसांनी तपास केला असता शाळेतील शिक्षकाला अटक करण्यात आली आहे.