कोल्हापूर - लॉकडाऊनच्या काळात सर्वसामान्य जनतेच्या हाताला रोजगार नाही. या काळात ग्राहकांनी जास्त वीज वापरली का नाही? याची खातरजमा न करता, त्यांना वाढीव वीज बिल पाठवले आहे. म्हणून ही घरगुती वीज बिल सरकारने माफ करून सर्वसामान्य जनतेला दिलासा द्यावा, अन्यथा संयम सुटला तर सरकारला शॉक देवू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे. एप्रिल, मे आणि जून या महिन्यातील ग्राहकांचे विज बिल सरकारने भरावे आणि 100 युनिट पर्यंतचे सर्व ग्राहकांचे बिल माफ करावे, या मागणीसाठी आज (सोमवारी) स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह सर्वपक्षीय राज्यस्तरीय धरणे आंदोलन कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आले. यावेळी शेट्टी बोलत होते. या आंदोलनात विधीतज्ञ प्रताप होगाडे हेही उपस्थित होते.
यावेळी शेट्टी म्हणाले, राज्यातील ग्राहकांचे वीज बिल माफ करण्यासाठी राज्य सरकारला साडेतीन हजार कोटींची रक्कम लागणार आहे. ही रक्कम मोठी नाही. घरगुती वीज बिल माफ करून जनतेला दिलासा द्यावा. जनतेने निर्माण केलेले सरकार आहे. जनता सरकारकडे चंद्र, सूर्य, तारे मागत नाही. केवळ वीज बिल माफ करण्याची मागणी करते. हा आमचा हक्क आहे. सरकारने आमच्या संयमाचा अंत पाहू नये, असेही राजू शेट्टी म्हणाले.
आंदोलनात राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर. के. पवार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील, बाबा पार्टे, प्रजासत्ताक संस्थेचे दिलीप देसाई यांच्यासह अन्य पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.