कोल्हापूर - अडीचशे वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेचा परिणाम आजही चंदगड तालुक्यातील कालकुंद्री व दुडंगे गावाला सहन करावा लागत आहे. एका सती गेलेल्या महिलेच्या शापामुळे या दोन्ही गावात कोणतीच सोयरीक केली जात नसल्याची अख्यायिका आहे. बी बियाणं, भाजीपाला यांचा कोणताही व्यवहार या गावांमध्ये होत नाही. नेमका काय प्रकार आहे? ते जाणून घ्या 'ईटीव्ही भारत'च्या विशेष रिपोर्टमधून...
येलगावड्याचा वंश वाढू दे... आणि पालगावड्याचा वंश मरू दे!
सुमारे अडीचशे वर्षांपूर्वीच्या घटनेचे आजही परिणाम जाणवत आहेत. येलगावडे (कालकुंद्री) गावातील तरुणीचा विवाह पालगावडे (दुडंगे) गावातील तरुणीशी झाला होता. काही वर्षांनंतर तिच्या नवऱ्याचा मृत्यू झाला. त्यावेळी पती मेल्यानंतर सती जाण्याची प्रथा समाजात होती. पतीच्या मृत्यूनंतर त्या तरुणीला इच्छा नसताना सती जाण्यासाठी गावकऱ्यांनी दबाव टाकला. जळत्या चितेत तिला ढकलण्यात आले. त्यावर चिडून त्या महिलेने 'येलगावड्याचा वंश वाढू दे आणि पालगावड्याचा वंश मरू दे!' असा शाप दिला. त्यानंतर मोठा वाद या दोन्ही गावात झाला. तेव्हापासून आजपर्यंत या गावात कोणतेच संबंध करण्यात आलेले नाहीत.
आजही दोन्ही गावांत भीती
या घटनेमुळे आजही दोन्ही गावांत भीती आहे. आपल्या मुलाचे वाईट होऊ नये? आपल्या मुलीचे वाईट होऊ नये? या भीतीपोटी एकाही व्यक्तीने दुसऱ्या गावातील कोणाशीही संबध ठेवलेले नाहीत. तर बाजरातील भाजी, खते, बियाणे देखील अन्य गावांमधून घेण्यात येते. भाजी विक्रेत्याला खरेदी करताना तू कोणत्या गावाचा? असा प्रश्न विचारण्यात येतो. संबंधित विक्रेता कालकुंद्री गावाचा असल्यास दुडंगे गावचे नागरिक भाजी खरेदी करत नाही.
आजही दोन्ही गावांमध्ये सोयरीक नाही
या घटनेचे वास्तव उदाहरण म्हणजे भीती पोटी कालकुंद्री ग्रामस्थांनी आपल्या गावातील एकही मुलांचा/मुलीचा विवाह दुडंगे गावातील लावून दिलेला नाही. व दुडंगे ग्रामस्थांनी वैवाहिक नाते कालकुंद्री गावांशी जोडले नाही.
कालकुंद्री व दुडंगे गाव हाकेच्या अंतरावर
भौगोलिक परिस्थिती पाहता कालकुंद्री व दुडंगे गाव हाकेच्या अंतरावर आहेत. त्याची सीमा म्हणजे ताम्रपाणी नदी होय. कालकुंद्री गावातून दुडंगेला जायचे असल्यास कुडनूर मार्गे जाता येते. तसेच कोवाड मार्गे देखील रस्ता आहे.
तरुणाचा विवाहाचा प्रयत्न... आणि घटना
कालकुंद्री व दुडंगे गावात सोयरीक करण्याचा प्रयत्न मुंबईत राहण्यास गेलेल्या एका तरुणाने केला. त्याने दुडंगे गावातील मुलीशी मुंबईत जाऊन प्रेमविवाह केला. मात्र कोरोनामुळे गावी परतलेल्या नवविवाहित तरुणीने ताम्रपाणी नदीत जीव देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे या गावात सोयरीक झाल्यास आगळीक व अभद्र घडेल, अशी भीती दोन्ही ग्रामस्थांना आहे.
सोयरीक करण्यास युवा वर्ग तयार, पण...
मागील अडीचशे वर्षांपासून सुरू असलेली ही प्रथा बंद करण्यासाठी तरुणांनी पुढाकार घेण्याची तयारी दाखवली आहे. मात्र वयोवृद्ध आजदेखील हा घटनेची धास्ती घेतात. विज्ञान युगासोबत पुढे जाण्यासाठी या ठिकाणचे तरुण एकत्र असले तरी समाजातील प्रथा, अंधश्रद्धा त्यांना माघार घेण्यास भाग पडतात. समाजातील प्रथा, अंधश्रद्धा आणि चालीरितींचा किती खोलवर परिणाम आजही समाजावर आहे, याचं उदाहरण म्हणजे ही दोन्ही गावं आहेत.