कोल्हापूर - महाराष्ट्र विधानसभा निवडणूक प्रचाराच्या तोफा झडत आहेत. सर्वत्र आघाडी विरूद्ध युती असा प्रचार सुरू आहे. मात्र, शाहूवाडी-पन्हाळा मतदार संघात शिवसेना विरूद्ध जनसुराज्य शक्ती अशी लढत होणार आहे. या मतदार संघात सत्यजीत पाटील सरुडकर आणि विनय कोरे निवडणूकीसाठी उभे आहेत. विनय कोरे यांनी आपला पक्ष काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये विलीन केला होता. मात्र, भाजपकडून त्यांना उमेदवारी न मिळाल्याने ते आपल्या जनसुराज्य शक्ती पक्षाकडून निवडणूकीच्या रिंगणात उतरले आहेत. येथे प्रत्यक्षात शिवसेना विरुद्ध भाजप असा सामना रंगलेला आहे.
२०१४च्या निवडणुकीत २७७ मतांनी विनय कोरे यांचा पराभव झाला होता. त्यावेळी पोस्टल मतदानाच्या आधारावर सत्यजीत पाटील सरुडकर निवडूण आले होते. मात्र, यावेळी परिस्थिती पुर्ण वेगळी आहे. सत्यजीत पाटील सरुडकर यांच्या विरुद्ध पन्हाळा तालुक्यातून मागच्या निवडणुकीला स्वाभीमानी शेतकरी संघटनेने आपला उमेदवार उतरवला होता. मात्र, यावेळी राजू शेट्टी यांच्या संघटनेने या निवडणूकीत आपला उमेदवार उतरवलेला नाही. या ठिकाणी आघाडीचे भाई भरत पाटील हे शेतकरी कामगार पक्षाकडून निवडणूक लढवत आहेत. मात्र, प्रत्यक्षात खरी लढत विनय कोरे आणि सत्यजीत पाटील सरुडकर यांच्यात आहे.
विनय कोरे हे वारणा उद्योग समुहाचे अध्यक्ष आहेत. पन्हाळा-शाहुवाडीतील ग्रामपंचायत, नगरपालिकांमध्ये त्यांची सत्ता आहे. शाहुवाडी तालुक्याला त्यांनी जिल्हापरिषदेचे सभापती पद दिले आहे. तालुक्याच्या राजकारणात त्यांना कारखाना आणि शिक्षण संस्थेमुळे महत्व प्राप्त झाले आहे. या मतदार संघातील बरेच मतदार मुंबईत कामासाठी असल्याने शिवसेना हा पक्षच सत्यजीत पाटलांसाठी महत्वाचा ठरतो आहे. शिवाय सत्यजीत पाटलांचा आपला वेगळा गट तालुक्यात कार्यरत आहे.
विनय कोरे यांनी जिल्हापरिषदेचे सभापती पद शाहूवाडी तालुक्यातील सर्जेराव पाटील पेरीडकर यांना दिले. यामुळे त्यांच्या मार्फत विनय कोरे यांना मतदान होईल असा अंदाज वर्तवला जात आहे. शिवसेनेचे उ मेदवार सत्यजीत पाटील यांचा एक गट तालुक्यात कार्यरत आहे. मात्र, प्रत्यक्षात सत्यजीत पाटील पन्हाळा तालुक्यातील किती मतदान आपल्याकडे वळवतात यावर सर्व अवलंबून आहे.