कोल्हापूर - स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचा कोरोना अहवाल दुसऱ्यांदा पॉझिटिव्ह आला आहे. विशेष म्हणजे, राजू शेट्टी यांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन डोस घेतले आहेत. त्यानंतरही त्यांना कोरोनाची दुसऱ्यांना लागण झाली आहे. सध्या ते डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली घरामध्येच उपचार घेत आहेत. दरम्यान, त्यांची प्रकृती ठीक असल्याची माहिती आहे. गेल्या सहा ते सात दिवसांपासून त्यांची प्रकृती अचानक बिघडली होती. त्यानंतर त्यांनी कोरोना चाचणी केली. त्यानंतर त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.
घरातल्या सदस्यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह
राजू शेट्टी यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर, त्यांच्या घरातील सर्व सदस्यांची चाचणी करण्यात आली. त्यामध्ये घरातील सर्व सदस्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. तसेच, राजू शेट्टी यांचीही प्रकृती उत्तम असून, डॉक्टरांच्या सल्ल्याने ते घरातच उपचार घेत आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांचे विविध ठिकाणी दौरे झाले आहेत. तसेच, त्यांनी अनेकांच्या भेटी-गाठी घेतल्या होत्या. या दरम्यान त्यांना कोरोणाची लागण झाली आहे. यापूर्वी राजू शेट्टी यांनी स्वतःहून आपण कोरोना पॉझिटिव्ह आल्याचे, सोशल मिडियाद्वारे सांगितले होते. मात्र, आता ते दुसऱ्यांना पॉझिटिव्ह आढळले आहेत. दरम्यान, काळजी करण्याचे कोणतेही कारण नसल्याची, माहिती शेट्टी यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे.