कोल्हापूर- जिल्ह्यात काल दिवसभर पावसाचा जोर कमी होता. त्यामुळे, पंचगंगा नदीची पातळी स्थिर आहे. काल सकाळी पंचगंगेच्या पातळीत ३ इंच वाढ झाली होती, तर सायंकाळी पंचगंगेच्या पाणी पातळीत १ इंचाची घट झाली होती. मात्र, ती पुन्हा ४४.१० फूट इतकी झाली आहे. पावसाचा जोर कमी राहिला तर पंचगंगेची पातळी धोका पातळीच्या खाली जाऊ शकते, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
पंचगंगेच्या पातळीत थोडीफार घट होत असल्याने कोल्हापूरकरांना दिलासा मिळाला आहे. मात्र, महापुराचा विळखा कायम असून सतर्क राहण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत. बुधवारी (5 ऑगस्ट) पंचगंगेने धोक्याची पातळी ओलांडली होती, तेव्हा जिल्ह्यातील १०२ बंधारे पाण्याखाली आले होते. आज दिवसभर पावसाचे प्रमाण कमी झाल्याने केवळ ९५ बंधारे सध्या पाण्याखाली आहेत.
काल सकाळी 8 वाजता राजाराम बंधाऱ्यावरील पाणी पातळी ४४. ७ फूट इतकी होती. दुपारी ३ वाजता बंधाऱ्यावरील पाणी पातळीत ४४.१० फूट म्हणजेच, ३ इंच इतकी वाढ झाली. सकाळी 8 ते दुपारी ३ वाजेपर्यंत केवळ पंचगंगेच्या पातळीत केवळ ३ इंच इतकी वाढ झाली होती. तर 3 ते 5 वाजेपर्यंत पातळी स्थिर राहिली. ५ वाजता पंचगंगेच्या पातळी १ इंचाने घट झाली. मात्र, धरण क्षेत्रात झालेल्या पावसाने पुन्हा पातळीत वाढ झाली. काल रात्री नऊच्या अहवालानुसार, राजाराम बंधाऱ्यावरील पाण्याची पातळी ४४.१० फूट इतकी होती. पावसाचा जोर कमी असल्याने आज दिवसभर पातळी स्थिर राहिली. सध्या राधानगरी धरणाच्या चार स्वयंचलित दरवाज्यातून ७ हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू आहे.
शुक्रवारी पावसाचा जोर वाढल्यास नदीच्या पातळीत वाढ होऊ शकते. तर पावसाचा जोर कमी झाल्यास धरणाचे दरवाजे बंद होऊन पंचगंगेच्या पातळीत घट होऊ शकते, असा अंदाज पाटबंधारे विभागाने व्यक्त केला आहे. गगनबावडा ते कळे मार्गावरील किरवे येथे रोडवर ३-४ फूट पाणी होते. मात्र, आज दिवसभर पावसाचा जोर कमी असल्याने रोडवरील पाणी ओसरले आहे. सध्या रोडवर १ फूट पाणी आहे.
हेही वाचा- कोल्हापूरमध्ये पूरस्थिती गंभीर; एनडीआरएफच्या पथकांनी केली पूरबाधित भागाची पाहणी