कोल्हापूर - निवडणुकीचा भत्ता मागणाऱ्या शिक्षकांना धक्काबुक्की झाल्याची घटना कोल्हापुरच्या गडहिंग्लज येथे घडली. २२ आणि २३ एप्रिल असे दोन दिवस पूर्णवेळ काम करूनही केवळ ३०० रुपये देत असल्याने संतप्त झालेल्या शिक्षकांनी जाब विचारण्याचा प्रयत्न केला. तेव्हा एका शिक्षकाला पोलीस अधिकाऱ्यांकडून धक्काबुक्की करण्यात आली. शिक्षकाने हा संपूर्ण प्रकार आपल्या कॅमेरात कैद केला.
गडहिंग्लज येथे काल १०० हून अधिक शिक्षकांना काल राखीव ठेवण्यात आले होते. राखीव शिक्षकांपैकी बऱ्याच शिक्षकांना झोनल ऑफिसर यांच्यासोबत कामगिरी देण्यात आली. बहुतांश शिक्षकांना २२ तारीख व २३ तारखेला पूर्णवेळ रात्री अकरा वाजेपर्यंत गडहिंग्लज येथे निवडणूक कार्यालयात थांबून घेण्यात आले. निवडणूक कामकाज पूर्ण झाल्यानंतर १० वाजता भत्ता मागत असताना भत्ता देण्यास अधिकाऱ्यांनी नकार दिला.
बऱ्याच शिक्षकांनी भत्त्याची मागणी करण्याचा प्रयत्न केला. परंतु याला कुठलीही दाद प्रशासनाकडून दिली नसल्याची तक्रार येथील शिक्षकांनी केली. याची विचारणा करत असताना अचानक एका पोलीस अधिकाऱ्याकडून भत्ता मागणाऱ्या शिक्षकाला धक्काबुक्की झाली. हा संपूर्ण प्रकार एका शिक्षकाने आपल्या कॅमेरात कैद केला. यावेळी सर्व शिक्षकांनी आपली एकजूट दाखवून पोलिसांची अरेरावी खपवून घेतली नाही. सर्वांनी याला विरोध करत प्रशासनाला शासनाने दिलेल्या नियमानुसार भत्ता देण्यास भाग पाडले.