कोल्हापूर - पंचगंगा नदीमध्ये जर निर्माल्य टाकून नदीचे प्रदूषण करत असाल तर आता तुमच्यावर थेट दंडात्मक कारवाई होऊ शकते. अशीच एक कारवाई आज करण्यात आली आहे. नदीपात्रात निर्माल्य टाकणाऱ्या व्यक्तीलाच टाकलेले निर्माल्य बाहेर काढायला लावून त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अशाच पद्धतीने कारवाईची मोहीम प्रशासनाने हाती घ्यावी, अशी नागरिक मागणी करत आहेत.
पंचगंगा नदीचे प्रदूषण हा कोल्हापूरातील एक मोठा आणि गंभीर प्रश्न आहे. मात्र, मागील 40 दिवसांपासून असलेल्या लॉकडाऊनमुळे पंचगंगा नदीचे पात्र आणि घाट अतिशय स्वच्छ आणि सुंदर बनले आहे. आता लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल करण्यात आला आणि लगेच नागरिक पुन्हा निर्माल्य नदीपात्रात टाकू लागले आहेत. अशा नागरिकांवर आता महानगरपालिकेचे आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी यांनी कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
त्यानुसार आरोग्य निरीक्षकांनी प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात केली आहे. आज सकाळी एका नागरिकावर निर्माल्य नदीत टाकल्यामुळे कारवाई करण्यात आली आहे. तसेच नदी प्रदूषणाबाबत 'त्या' व्यक्तीचे प्रबोधन करून यापुढे निर्माल्य कुंडामध्येच निर्माल्य टाकावे, अशा सूचना सुद्धा देण्यात आल्या. दरम्यान, पालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱयांकडून अशाच पद्धतीने यापुढेही कारवाई सुरू रहावी, अशी मागणी नागरिक करत आहेत. आरोग्य निरीक्षक अरविंद कांबळे, आरोग्य निरीक्षक ऋषिकेश सरनाईक, निलेश पोतदार यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली.