कोल्हापूर : करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर परिसरात महिलांसाठी स्वच्छतागृह नसल्याने आज शिवसेनेसह अनेक सामाजिक संस्था रस्त्यावरती उतरल्या आहेत. अंबाबाई मंदिर परिसरात स्वच्छतागृह नसल्याने पर्यटकांसह महिलांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे आज शिवसेनेच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढून महिलांसाठी स्वच्छ्तागृह बांधावी याकरिता हात जोडत जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडे मागणी केली आहे. यामुळे अंबाबाई मंदिरातील स्वच्छतागृहाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
महिलांची कुचंबना : साडेतीन शक्तीपीठांपैकी एक अशी करवीर निवासिनी आई अंबाबाईची ओळख आहे. येथे रोज जिल्ह्यासह राज्यातून हजारो भाविक दर्शनासाठी मोठ्या प्रमाणत येत असतात. यामध्ये महिला भाविकांची संख्या मोठी आहे. असे असले तरी करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर परिसरात भाविकांच्या सोयीसुविधांचा पुरता बोजवारा उडाला आहे. दर्शनासाठी आलेल्या महिला भाविकांना स्वच्छतागृह नसल्याने त्यांची कुचंबना होत आहे. यामुळे आज शिवसेनेच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर जिल्ह्यातील महिला, संघटना एकत्र येत जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढला आहे. यावेळी महिलांच्या हातातील फलक हे लक्षवेधी ठरत होते. तर सर्व महिलांनी जिल्हाधिकारी यांच्या दालनात जाऊन महिलांची व्यथा मांडत हात जोडून महिलांसाठी स्वच्छतागृह उभा करावी, असे आवाहन केले आहे. शिवाय लवकरात लवकर मागणी पूर्ण न झाल्यास आज (मंगळवारी) मूक मोर्चा काढला. मागणी मान्य न झाल्यास उद्या उग्र आंदोलन करावे लागेल, असा इशाराही महिलांनी यावेळी दिला आहे.
भाविकांकडून पैशांची लूट : करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर परिसरात स्वच्छतागृहाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी नवीन स्वच्छतागृह बांधण्यासाठी जुने स्वच्छतागृह पाडण्यात आले; मात्र गेल्या काही महिन्यापासून स्वच्छतागृहाचे बांधकाम अर्धवट अवस्थेत पडून आहे. तर महिलांसाठी तात्पुरती सुविधा देखील येथे उपलब्ध नाही. दुसऱ्या बाजूला परिसरातील हॉटेल व यात्री निवासमध्ये भाविकांकडून पैशांची लूट करत स्वच्छतागृह वापरण्यात येत असल्याचे देखील समोर आले आहे. अंबाबाई मंदिर परिसरात स्वच्छतागृहासाठी जागा उपलब्ध होत नसल्याने शासनासमोर एक मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, मेन राजारामसह परिसरातील अनेक शासकीय कार्यालय हे आता स्थलांतरित करण्यात येत असून त्या ठिकाणी भाविकांसाठी सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी महिलांना सांगितले आहे.