कोल्हापूर - ढोल ताशाच्या गजरात कोल्हापुरात शनिवारी नवीन वर्षाचे स्वागत करण्यात आले. करवीर गर्जना या ढोल पथकाच्या वतीने शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये हजारो तरुण तरुणी सहभागी झाल्या. विशेष म्हणजे ढोल पथकात तरुणींचा सहभाग उल्लेखनीय होता. कोल्हापूरची संस्कृती जपण्याच्या उद्देशाने पारंपरिक वेशभूषा करून महिला बुलेट रॅलीमध्ये सहभागी झाल्या.
यावेळी डोक्याला कोल्हापुरी फेटा, गळ्यात विविध अलंकार, पायात कोल्हापुरी चप्पल परिधान करून महिला यावेळी उपस्थित राहिल्या. कोल्हापुरी फेट्याबरोबरच पुणेरी पगडी देखील घालून एक महिला या बाईक रॅलीमध्ये सहभागी झाली. नवीन वर्षाच्या स्वागताला कोल्हापुरात अनोखी शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेमध्ये भारतीय हवाई दलाची ताकद जगासमोर यावी, या उद्देशाने लढाऊ विमानांची प्रतिकृती उभा केली. त्याचबरोबर अभिनंदन वर्धमान यांच्या स्टाईलने मिशा ठेवून एक तरुण देखील या ठिकाणी उभा होता.