कोल्हापूर Maratha Protest For Reservation: मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस असून त्यांची तब्येत खालावत चालली आहे. यामुळे आता मराठा समाज आक्रमक झाला असून संपूर्ण राज्यात मराठा समाजाकडून आमरण आणि साखळी उपोषणाला केले जात आहे. आरक्षणाचे जनक छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या कोल्हापूर जिल्ह्यात देखील आजपासून बेमुदत साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे. (Maratha Protest in Kolhapur) आज सकाळी 11 च्या सुमारास ऐतिहासिक दसरा चौकात राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करत मराठा आरक्षणाची मशाल पेटवण्यात आली. यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
मुख्यमंत्र्यांचा कोल्हापूरचा गुप्त दौरा: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काल रात्री अचानक कोल्हापूर दौऱ्यावर आले. यावेळी मराठा आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. यामुळे आक्रमक झालेल्या मराठा आंदोलकांनी एकदा शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली. एकनाथ शिंदे हे अंधारातून आले आणि पळून गेले. या सरकारकडून वारंवार आश्वासन मिळत आहेत; मात्र या आश्वासनांना आता आम्ही फसणार नाही. आरक्षणाची मशाल आता आम्ही पेटवली आहे आणि यात हे सरकारची राखरांगोळी आम्ही करून टाकू. कोर्टात टिकणारं आरक्षण आम्ही घेऊन दाखवू असा इशारा सकल मराठा समाजाचे निमंत्रक ॲड. प्रवीण इंदुलकर यांनी दिला आहे.
मराठा आंदोलक रस्त्यावर: कोल्हापूर शहरात साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे. दुसऱ्या बाजूला जिल्ह्याच्या ग्रामीण भागात देखील मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे. शाहूवाडी तालुक्यातील बांबवडे इथं एसटी बसवरील पंतप्रधान नरेंद्र मोदी, यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह राजकीय नेत्यांच्या पोस्टरला काळं फासत 'एक मराठा-लाख मराठा' असं घोषवाक्य लिहिण्यात आलं आहे. तर आजरा येथे शिवसेना शिंदे गटाचे खासदार संजय मंडलिक आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार राजेश पाटील यांच्या गाड्यांसमोर मराठा आंदोलक आडवे झोपत त्यांना गावात येण्यास विरोध केला आहे. त्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले आहेत. दरम्यान पोलिसांनी मध्यस्थी करत आंदोलकांना ताब्यात घेतलं असून गावात सध्या तणावपूर्ण वातावरण आहे.
जरांगेंच्या तब्येतीसाठी देवाला साकडं: सकल मराठा भुदरगड तालुका यांच्या वतीनं मराठा आरक्षणाकरिता शासनाच्या निषेधार्थ अर्धनग्न आंदोलन करण्यात येत आहे. गारगोटी येथील क्रांतीज्योती समोर सकल मराठा समाजाचे युवक एकत्र येत अर्धनग्न आंदोलन करत मराठा समाजाला तातडीने आरक्षण देण्याची मागणी केली आहे. तर दुसऱ्या बाजूला शिरोळ तालुक्यातील सैनिक टाकळी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या जीवाचे रक्षण कर तसेच सरकारला मराठा आरक्षण देण्याची बुद्धी दे, अशी प्रार्थना केली जात आहे. याकरिता कृष्णा नदीत स्नान करून ओल्या कपड्याने गावातील ग्रामदैवत श्री रामेश्वर आणि मंदिरात देव देवतांना नदीचे पाणी घालून पूजा करत अनोखे आंदोलन केले गेले.
हेही वाचा:
- Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी समाज आक्रमक, अनेक नेत्यांचे पूर्वनियोजित कार्यक्रम रद्द; जाणून घ्या राज्यात कुठे काय परिस्थिती
- Maratha Reservation : केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी शिवीगाळ केलेला मराठा तरुण 'ईटीव्ही भारत'वर; म्हणाला...
- Maratha Reservation : मनोज जरांगे पाटलांची तब्येत खालावली, मराठा समाज आक्रमक; पाहा व्हिडिओ