कोल्हापूर - केंद्र सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर केलेल्या 20 लाख कोटींच्या पॅकेजचे काय झाले? याचा जाब विचारण्यासाठी आज युवक काँग्रेसच्यावतीने भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या घरी व कार्यकारणी सदस्य धनंजय महाडिक यांच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी राजकीय वैरी असलेल्या 'मुन्ना' आणि 'बंटी'चे कार्यकर्ते आमने-सामने आल्याने वातावरण काही काळ तणावपूर्ण बनले होते. यावेळी पोलिसांनी काँग्रेसच्या आंदोलकांना ताब्यात घेतले.
कोरोनाच्या काळात नरेंद्र मोदी सरकारने जाहीर केलेल्या 20 लाख कोटींच्या पॅकेजचे काय झाले? याचा जाब विचारण्यासाठी युथ काँग्रेसच्या वतीने आज राज्यभर आंदोलन पुकारण्यात आले आहे. याचाच भाग म्हणून कोल्हापूर जिल्ह्यात युथ काँग्रेसच्या वतीने भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या घरासमोर निदर्शने करण्यात आली तर दुसरीकडे भाजपचे नेते धनंजय महाडिक यांच्या कार्यालयासमोरदेखील युथ काँग्रेसच्या वतीने निदर्शने करण्यात आली.
हेही वाचा - खाऊचे आमिष दाखवून महिला आणि तिची अल्पवयीन मुलगी लहान मुलांशी करायचे लैंगिक चाळे
दरम्यान, भाजप नेते धनंजय महाडिक यांच्या कार्यालयासमोर काँग्रेसचे कार्यकर्ते निदर्शने करण्यासाठी आल्यानंतर पोलिसांची आणि आंदोलकांची झटापट झाली. यावेळी पोलिसांनी जबरदस्ती आंदोलकांना ताब्यात घेतले, मात्र काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला. दुसरीकडे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या संभाजीनगर येथील निवासस्थानासमोर युथ काँग्रेसच्यावतीने मूक आंदोलन करण्यात आले. हातात पोस्टर घेऊन 20 लाख कोटी रुपयांच्या पॅकेजचे काय झाले? असा प्रश्न उपस्थित केला.
हेही वाचा - गुन्हेगाराच्या घरात चोरी करणाऱ्या अट्टल चोरट्याला अटक, २७ लाखांचा मुद्देमाल हस्तगत