कोल्हापूर - गंभीर कोरोना रुग्णांवर कोल्हापुरात प्रथमच प्लाझमा थेरेपी होणार आहे. राज्यातील बहुधा हा पहिलाच प्रयोग असल्याचे म्हटले जात आहे. कोल्हापुरातील कोरोनामुक्त झालेल्या पहिल्या रुग्णाच्या रक्तामधून प्लाझमा घेण्यात आला आहे. गंभीर, अत्यवस्थ कोरोना रुग्णांवर या प्लाझमा थेरेपीच्या माध्यमातून उपचार करण्यात येणार आहेत. त्यासाठी इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) कडे मान्यतेसाठी पाठवण्यात आले आहे.
पुण्याहून आलेला भक्तीपूजानगरमधील पहिला कोरोना रुग्ण 18 एप्रिलला कोरोनामुक्त झाला आहे. या कोरोनामुक्त झालेल्या तरुणाच्या मान्यतेने त्याच्या रक्तातील 550 मिली प्लाझमा घेण्यात आला आहे. याबाबत या रुग्णावर उपचार करणारे आणि अथायू रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सतीश पुराणिक यांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, रोगमुक्त झालेल्या रुग्णाच्या शरिरामध्ये ॲन्टीबॉडीज तयार होतात. म्हणजे एखाद्या विषाणूने शरिरात प्रवेश केल्यावर शरिरातील सैनिक त्याच्याशी लढण्यासाठी सज्ज होतात. या कोरोनामुक्त झालेल्या रुग्णाच्या शरिरातून रक्त घेतलेल्या प्लाझमामध्ये या ॲन्टीबॉडीज आहेत. म्हणजे एखादा गंभीर रुग्ण असेल तर त्याच्या शरिरातील विषाणूसाठी अतिरिक्त सैनिकांची कुमक या प्लाझ्माच्या माध्यमातून तयार ठेवण्यात आली आहे. याच सैनिकांच्या बळावर अत्यवस्थ रुग्णाचा जीव आपण वाचवू शकतो, असेही ते म्हणाले आहेत.
सीपीआरमधील रक्तपेढीचे तंत्रज्ञ रमेश सावंत म्हणाले, 14 दिवसांच्या कालावधीनंतर कोरोना रुग्णाच्या स्वॅबची दोनवेळा पुन्हा तपासणी केली जाते. हे दोन्ही अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर अशा कोरोनामुक्त रुग्णाचा प्लाझमा घेण्यात येतो. सद्या घेतलेला प्लाझमा इतर तपासणी करून रक्तपेढीत संकलित करण्यात आला आहे. हा प्लाझमा आवश्यकतेनुसार रुग्णाच्या उपचारासाठी वापरण्यात येईल, असेही सावंत यांनी म्हटले.
कोरोनाबाधित गंभीर, अत्यवस्थ रुग्णावर प्लाझमा थेरेपीच्या माध्यमातून उपचार करण्यासाठी आयसीएमआरकडे मान्यतेसाठी पाठवण्यात आला आहे, असे सांगून हिमॅटोलॉजिस्ट डॉ. वरूण बाफना म्हणाले, तातडीच्या वेळी या प्लाझमा उपचारासाठी उपयोग करू शकतो. सद्या उपचार घेत असणाऱ्या रुग्णांच्या सहमतीने काही जणांच्या रक्तातील प्लाझमा घेण्यात येणार आहे. भविष्यात हा प्लाझमा अत्यवस्थ रुग्णांवर उपचार करण्यासाठी उपयोगी पडणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.