कोल्हापूर - गोकुळ हा राज्यातील सर्वात मोठा सहकारी दूध प्रकल्प मल्टीस्टेट करण्याचे ठरवल्यानंतर आता संबंधित निर्णय रद्द करण्यात आल्याची माहिती गोकुळच्या अध्यक्षांनी पत्रकाद्वारे दिली आहे. तसेच गोकुळ मल्टीस्टेट करण्याविरोधात उभारलेला लढा यशस्वी झाल्याचे आमदार सतेज पाटील यांनी सांगितले. मात्र, गोकुळच्या इतर प्रश्नांसाठीचा लढा कायम राहणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
गोकुळ दूध संघाच्या सर्वसाधारण सभेसाठी जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची आज शासकीय विश्रामगृहात बैठक पार पडली. यावेळी अध्यक्ष सतेज पाटील यांनी मल्टीस्टेट होण्यासंबंधी घेण्यात आलेला निर्णय रद्द केल्याची माहिती दिली.
राज्यातील सर्वात मोठा सहकारी दूध प्रकल्प असलेल्या गोकुळ मल्टीस्टेट करण्याचा प्रस्ताव सत्तारूढ गटानेच रद्द केल्याने मल्टीस्टेटच्या विरोधात संघर्ष करणाऱ्या सतेज पाटील यांनी निर्णयाचे स्वागत केले आहे. तसेच येत्या 30 ऑक्टोबरला पार पडणाऱ्या सर्वसाधारण सभेत संबंधित प्रस्ताव रद्द झाल्याचा ठराव करून तो राज्य सरकारकडे पाठवण्याची विनंती त्यांनी केली.
गोकुळच्या या निर्णयानंतर आमदार हसन मुश्रीफ यांनीही निर्णयाचे स्वागत करून इतर प्रश्नांबाबत उभारलेला लढा यापुढेही कायम ठेवणार असल्याचे स्पष्ट केले. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. गोकुळ ग्रुप मल्टीस्टेट करण्याचा ठराव रद्द केल्यानंतर सतेज पाटील, हसन मुश्रीफ व आमदार ऋतुराज पाटील यांना पेढे भरवून त्यांचे कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले.