कोल्हापूर : गेल्या वर्षभरापासून कोल्हापुरात सुरू असलेला जयप्रभा स्टुडिओचा वाद पुन्हा उफाळून आला आहे. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या मुलाने चुकीच्या पद्धतीने जयप्रभा स्टुडिओ एका पानपट्टी चालकाच्या मदतीने विकत घेतला. पानपट्टी चालकाने आणि क्षीरसागर कुटुंबीयांनी कोल्हापूरकरांना चुना लावला आहे असा गंभीर आरोप शिवसेना ठाकरे गटाचे शहराध्यक्ष रविकिरण इंगवले यांनी केला आहे. जयप्रभा स्टुडिओचा व्यवहार संशयास्पद असून याप्रकरणी राजेश क्षीरसागर कुटुंब आणि पानपट्टी चालक सचिन राऊत यांची ईडीद्वारे चौकशी आणि नार्कोटेस्ट करावी अशी मागणी, रविकिरण इंगवले यांनी केली आहे. ते आज कोल्हापूरात पत्रकार परिषदेत बोलत होते.
राजेश क्षीरसागर यांच्यावर गंभीर आरोप : दोनच दिवसांपूर्वी राज्य शासनाने जयप्रभा स्टुडिओची जागा महापालिकेला हस्तांतरित करून घेण्याचे परिपत्रक काढले. ज्या संस्थेने ही जागा घेतली त्यांना पर्यायी जागा देण्याच्या सूचना राज्य शासनाने महापालिकेला दिल्या आहेत. त्यामुळे राजेश क्षीरसागर यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करत साखर पेढेही वाटले होते. ज्यावेळी आपण कुठल्याही चुकीच्या पद्धतीने व्यवहार केला नसल्याचा पुनरुच्चार राजेश क्षीरसागर यांनी पत्रकार परिषदेत केला होता. मात्र आज ठाकरे गटाचे शहरप्रमुख रवीकिरण इंगवले यांच्यासह जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, शहर प्रमुख सुनील मोदी यांनी पत्रकार परिषद घेत राजेश क्षीरसागर यांच्यावर गंभीर आरोप केले. पानपट्टी चालक सचिन राऊत यांना पुढे करून राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी कोल्हापूरकराना चुना लावल्याची टिका रविकिरण इंगवले यांनी केली आहे.
सहा कोटी पन्नास लाख रुपये पानपट्टी चालकाकडे कोठून आले : रविकिरण इंगवले म्हणाले की, महाराष्ट्र राज्य शासनाच्या ताब्यातील जागा सि.स.नं. २८१४/क (जय प्रभा स्टुडिओ) ही जागा क्षीरसागर कुटुंब आणि सचिन राऊत (पानपट्टी चालवणारा) यांनी शासनास व मिळकत धारकास घेऊन चुकीच्या पध्दतीने कागदपत्रे दाखवून दि. १५/०२/२०२० रोजी खरेदी केले. मुळात संस्थान काळात पेंढारकर कुटुंबियांना शर्ती व अटींवर ही जागा संस्थेच्या नावे दिली होती. ज्यामध्ये स्टुडिओसाठी सदर जागेचा उपयोग करावा, तसेच ही जागा शासनाच्या पूर्व परवानगीशिवाय हस्तांतर करता येणार नाही असे म्हटले होते.
संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी : पेंढारकर आणि लता मंगेशकर यांनी वेगवेगळी शक्कल लढवत लिलाव पध्दतीने ती जागा लता मंगेशकर यांना हस्तांतरीत केली. त्याचवेळी अटी व शर्तीचा भंग झाला होता. त्यानंतर पुन्हा एकदा विना परवाना मंगेशकर कुटुंबियांनी ती जागा सचिन राऊत यांना विकली. खरेदी पत्रामध्ये सहा कोटी पन्नास लाख रुपये एका रकमेने पानपट्टी चालवणारा सचिन राऊत यांनी भरले आहेत. तर काळा पैसा किती दिला असेल त्याचा हिशोब नाही. यातूनच एक पानपट्टीवाला इतका पैसा कोठून आणतो. यासाठीच त्यांची नार्कोटेस्ट करण्यात यावी अशी मागणी इंगवले यांनी केली. तसेच या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी यासाठी उद्या ठाकरे गटाच्या वतीने जिल्हा आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे. तसेच निदर्शने ही करण्यात येणार आहे. त्याचबरोबर लवकरच न्यायालयात देखील जाणार आहोत असे शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने सांगण्यात आले आहे. यामुळे आता या प्रकरणावर मुख्यमंत्री कोणता निर्णय घेणार याकडे कोल्हापूरकरांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा -