पन्हाळा (कोल्हापूर)- पन्हाळा गडाच्या पायथ्याला असणाऱ्या वनखात्याच्या जंगल हद्दीत गव्यांच्या कळपाचे दर्शन झाले. जवळपास 15 ते 20 गवे या कळपामध्ये पाहायला मिळाले. यामध्ये पूर्ण क्षमतेने वाढलेले आणि काही छोटे गवे सुद्धा होते.
नवी सोमवारपेठ या गावात संजीवन शैक्षणिक संकुल मोठ्या प्रशस्त जागेत आहे. सद्या शाळा बंद आहेत. शाळेतील विद्यार्थ्यांचा किलबिलाट नेहमीच या परिसरात असतो. मात्र, सध्या लाॅकडाऊनमुळे शाळा बंद असल्याने परिसरात निरव शांतता पसरली आहे. त्यामुळे परिसरात गव्यांचा वावर वाढला आहे. यापूर्वी बरेच वर्षे नागरिकांना या भागात गव्यांचे दर्शन झाले नव्हते.
मात्र, आता इतक्या मोठ्या संख्येने गवे आपल्या गावाच्या हद्दीत वावरत असल्याचे पाहून बांधारी परिसरातील इंजोळे, सोमवारपेठ, गुडे, निकमवाडी, धबधबेवाडी, राक्षी, बुधवार पेठ, नेबापूर, आपटी, तुरुकवाडी या गावातील नागरिक भयभीत झाले आहेत.
गावातीलच काही युवकांनी संजीवन शाळेच्या संरक्षण भिंतीच्या काही अंतरावरच जंगलामध्ये या गव्यांचे चित्रण आपल्या मोबाईलच्या कॅमेरामध्ये कैद केले. दरम्यान, गव्यांच्या कळपाने संपूर्ण पन्हाळ्याच्या सभोवतालच्या बांधारी परिसरामध्ये धुमाकूळ घातला आहे. शेतीचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे वनविभागाने याकडे लक्ष देऊन याबाबत काही उपाययोजना राबविण्याची मागणी केली आहे.