कोल्हापूर - गडहिंग्लज विभागाचे पोलीस उपअधीक्षक अंगद जाधवर याच्यावर अखेर गुन्हा दाखल झाला आहे. खोटे व बनावट कागदपत्रे तयार करून जमीन हडप केल्याप्रकरणी डीवायएसपी जाधवर यांच्यासहित 5 जणांविरोधात चंदगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक प्रकरणात या अधिकाऱ्याचे नाव घेतले जात होते. अखेर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय.
गुन्ह्यातील नावे कमी करण्याच्या प्रकरणात सुद्धा डीवायएसपीच्या नावाची चर्चा होती. चंदगड पोलीस ठाण्यात गणेश फाटक याच्यावर आतापर्यंत फसवणुकीचे तीन गुन्हे दाखल झाले होते. त्यामध्ये आता डीवायएसपी जाधवर याचे नाव आल्याने सर्वत्र खळबळ माजलीये.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चंदगड तालुक्यातल्या हंबीरे गावातील लक्ष्मण भोजु तांबाळकर यांनी 2009 साली कृष्णा बाळू गावडे आणि गोविंद बाळू गावडे यांच्याकडून जवळपास अडीच एकर जमीन विकत घेतली होती. जमीन खरेदी केल्यापासून तांबाळकर शेतजमीन कसत होते. 2016 साली खोटे दत्तकपत्र करून श्रीशैल नागराळ यांनी ही जमीन बाळकावण्याचा प्रयत्न केला असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.
उपअधीक्षक अंगद जाधवर यांनी श्रीशैल तमन्ना नागराळ, गणेश महादेव फाटक, मारुती धोंडिबा गुरव आणि मारुती तातोबा कांबळे या चौघांच्या साथीने खोटी कागदपत्रे तयार करून तांबाळकर यांची जमीन खरेदी केली. शिवाय तांबाळकर यांना गोळ्या घालून ठार करू, अशी धमकी दिल्याची सुद्धा तक्रार दिली. त्यानंतर जाधवर यांच्यासह ५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.