कोल्हापूर - जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये जवळपास नव्वद ते शंभर नवीन रुग्ण आढळले आहेत, तर चार जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा कोरोना डोकं वर काढू लागला असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. नागरिकांनी आता अधिक काळजी घेणे गरजेचे बनले आहे. कोल्हापूर जिल्हा जवळपास कोरोनामुक्तच झाला होता. मात्र, आता पुन्हा एकदा रुग्ण वाढू लागले असून एकूण रुग्णांची संख्या 187 वर जाऊन पोहोचली आहे.
जिल्ह्यातील एकूण कोरोना आकडेवारीवर एक नजर -
कोल्हापूर जिल्ह्यात आजपर्यंत एकूण रुग्णांची संख्या 50 हजार 286 वर पोहोचली आहे. त्यातील 48 हजार 358 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे सद्यस्थितीत अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 187 इतकी आहे. 1 जानेवारी 2021 रोजी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या 39 इतकी होती. तर एकूण 1708 रुग्णांचा मृत्यू झाला होता. आजरोजी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या 187 वर पोहोचली असून एकूण मृतांची संख्या 1741 झाली आहे. नवीन रुग्ण आढळण्याचे तसेच मृत्यूचे प्रमाण गेल्या दोन दिवसांपासून किंचित वाढले आहे. ही आकडेवारी धोकादायक जरी नसली तरी चिंताजनक मात्र आहे.
जिल्ह्यात उत्तम उपाययोजना -
कोरोना काळात कोल्हापूरमध्ये झपाट्याने रुग्ण वाढले, तसेच उपाययोजना सुद्धा मोठ्या प्रमाणात राबविण्यात आल्या होत्या. जिल्ह्यात विविध ठिकाणी अत्याधुनिक सामग्रीसह कोव्हिड केंद्र उभी करण्यात आली होती. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण राज्यात चांगले होते. आता सुद्धा रुग्णसंख्या वाढली तर प्रशासन पूर्णपणे सज्ज असून नागरिकांना मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करण्यासाठी सांगितले जात आहे. महापालिकेकडून तर अजूनही नियम मोडणाऱ्यांकडून दंड वसूल केला जात आहे. मात्र, काही नागरिक या सर्व नियमांना धाब्यावर बसवून बिनधास्तपणे सर्वत्र फिरत असतात. त्यामुळे अशा नागरिकांनी आता अधिक सावध राहणे गरजेचे आहे.
वयोगटानुसार रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे -
1 वर्षाखालील - 57
1 ते 10 वर्ष - 1896
11 ते 20 वर्ष - 3512
21 ते 50 वर्ष - 26683
51 ते 70 वर्ष -14467
71 वर्षांवरील - 3672
जिल्ह्यात असे एकूण 50 हजार 286 रुग्ण झाले आहेत.
तालुक्यानुसार रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे -
1) आजरा - 887
2) भुदरगड - 1236
3) चंदगड - 1228
4) गडहिंग्लज - 1506
5) गगनबावडा - 152
6) हातकणंगले - 5325
7) कागल - 1684
8) करवीर - 5734
9) पन्हाळा - 1871
10) राधानगरी - 1254
11) शाहूवाडी - 1363
12) शिरोळ - 2512
13) नगरपालिका कार्यक्षेत्रातील - 7516
14) कोल्हापुर महानगरपालिका - 15556
15) इतर जिल्ह्यातील, राज्यातील - 2462