कोल्हापूर - जिल्ह्यातील सर्वात तरुण आमदार ऋतुराज पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. बुधवारी रात्री उशिरा काँग्रेसच्या या तरुण आमदाराचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांच्यावर सध्या कोल्हापूरमध्येच उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती सुद्धा स्थिर असल्याची माहिती त्यांनी स्वतः दिली आहे. मात्र, त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
दरम्यान, गेल्या 4 ते 5 महिन्यांपासून आमदार पाटील यांनी कामाचा सपाटाच लावला आहे. आपल्या मतदारसंघासह संपूर्ण शहरात जीवनावश्यक वस्तूंचे वाटप, 10 हजार व्यावसायिकांना सॅनिटायझर स्प्रे च्या बॉटल, मतदारसंघातील डॉक्टरांनी दवाखाने बंद न ठेवता कोरोना काळात नागरिकांना आरोग्य सेवा पुरवावी म्हणून 1 हजार पीपीई किटचे वाटप केले होते. याची सलमान खानने सुद्धा दखल घेत आमदार पाटील यांचे ट्विट करत कौतुक केले होते.
कोल्हापूर जिल्ह्यात कामासाठी आलेल्या परप्रांतीय कामगारांना त्यांच्या गावी पाठविताना त्या सर्वांच्या जेवणाची व्यवस्था, नुकतेच दोन दिवसांपूर्वी त्यांनी स्वतःच्या निधीतून एक रुग्णवाहिका सुद्धा प्रशासनाला दिली असून अशी अनेक कामं सातत्याने सुरू आहेत. त्यामुळे नेहमीच अनेक लोकांच्या ते संपर्कात होते. या दरम्यान त्यांची कोरोना चाचणी केली असता, त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे.
सोशल मीडियावरून आमदार पाटील यांनी दिली माहिती -
माझी कोविड-19 चाचणी करण्यात आली होती. बुधवारी रात्री रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने कोल्हापुरात उपचार सुरू आहेत. माझी तब्येत ठीक आहे, काळजी करु नये. पण माझ्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाने योग्य ती काळजी घ्यावी, ही विनंती, असं ट्वीट ऋतुराज पाटील यांनी केलं आहे. शिवाय इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा आमदार पाटील यांनी माहिती दिली आहे.