कोल्हापूर - साखर कारखान्याच्या सभासदांना आता केवळ शंभर रुपये दराने 1 लिटर सॅनिटायझर मिळणार आहे. 2019-20 मध्ये ज्यांनी कारखान्याला ऊस पुरवठा केला त्या सर्वांनाही सवलतीच्या दरात सॅनिटायझर देण्यात येणार आहे. कागल तालुक्यातील छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याने हा अनोखा उपक्रम सुरू केला आहे.
कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर 'फास्ट ओ क्लिन' या नावाने शाहू कारखान्याने आपला स्वतंत्र सॅनिटायझर ब्रँडच तयार केला आहे. शाहू ग्रुपच्या अनेक संस्थांच्या कर्मचाऱ्यांना सुद्धा केवळ 100 रुपयांत 1 लिटर सॅनिटायझर मिळणार असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी दिली.
कोरोनावर मात करण्यासाठी अनेकजण आपआपल्यापरीने प्रयत्न करत आहेत. या काळात वैयक्तिक स्वच्छता आणि सामाजिक स्वास्थ्याकडे देखील लक्ष देणे गरजेचे आहे. सध्या कोरोना संकटाच्या काळात सॅनिटायझरची कमतरता जाणवत आहे. सर्वसामान्यांना हॅन्ड सॅनिटायझर सहजपणे मिळावे या अनुषंगाने शाहू कारखान्याच्या डिस्टलरी प्रकल्पामार्फत ‘फास्ट ओ क्लिन’ या नावाने हॅन्ड सॅनिटायझरची निर्मिती सुरू आहे.
विविध आकाराच्या बॉटलमध्ये हे सॅनिटायझर उपलब्ध करून देण्यात आले आहे. बाजारात 500 रुपये किंमत असलेले सॅनिटायझर आता केवळ 100 रुपयांत उपलब्ध होणार असल्याचेही समरजित घाटगे यांनी सांगितले. राज्यातील इतर कारखान्यांनीसुद्धा अशाच पद्धतीने आपल्या डिस्टलरी प्रकल्पामार्फत नागरिकांना सवलतीच्या दरात सॅनिटायझर उपलब्ध करून दिल्यास कोरोनाविरुद्धच्या लढाईत आपले मोलाचे योगदान असणार आहे.