कोल्हापूर - भारतीय जनता पार्टी (BJP) राज्यातील सर्वच जागांवर आपला उमेदवार देणार आहे. एवढेच नाही तर त्या सर्वच जागांवर आपला विजय होणार असून महाविकास आघाडीला (Mahavikas Aaghadi) आता महागात पडणार आहे, असा विश्वास भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनी व्यक्त केला आहे. ते कोल्हापूरात बोलत होते.
कोल्हापूरात भाजपाचा उमेदवार लवकरच जाहीर होईल -
एकीकडे, कोल्हापूरात पालकमंत्री सतेज पाटील यांच्या विरोधात नेमका कोण उमेदवार असेल याबाबत अद्याप काहीही स्पष्ट नाही आहे. याबाबतच विचारले असता चंद्रकांत पाटील म्हणाले, राज्यासह कोल्हापूरात सुद्धा भाजपाचा उमेदवार असेल. याबाबत बैठक आयोजित करण्यात आली असून दोन दिवसांत आमचाही उमेदवार जाहीर होईल. शिवाय अंकगणित समजत असेल तर कागद, पेन घ्या आणि बेरीज करा. आमचा सर्वच जागांवर विजय होईल. महाविकास आघाडीला आता खूप महागात पडणार असल्याचेही त्यांनी म्हटले.
400 पैकी 400 का माहीत? चंद्रकांत पाटलांचा उपहासात्मक टोला
एकीकडे विधानपरिषदेची रणधुमाळी (MLC Election) सुरू असतानाच महाविकास आघाडीकडून कोल्हापुरात 400 पैकी 300 मतांचा दावा केला जात आहे. याबाबत विचारले असता भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले, 400 पैकी 400 का नाहीत? तुम्हालाच सगळी मते घेऊन टाका, असे म्हणत उपहासात्मक टोलाही त्यांनी लगावला.