कोल्हापूर - कोरोनाविरुद्धच्या लढ्याला यशस्वी करण्यासाठी सतत टाळेबंदीचा पर्याय निवडण्याऐवजी पायाभूत सुविधा वाढविण्यासह प्रभावी उपाययोजनांवर भर देण्याचे आवाहन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना केले आहे. व्हिडिओ मॅसेज करून चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना आवाहन केले असून यामध्ये कोणतेही आरोप किंवा टीका न करता त्यांनी या कोरोना काळात काय करणे गरजेचे आहे याबाबत आवाहन केले आहे. शिवाय आता मेडिकल कॉलेजच्या शेवटच्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची मदत घ्यायला हवी असेही त्यांनी म्हटले आहे.
नेमकं काय म्हणाले चंद्रकांत पाटील..?
मुख्यमंत्र्यांना केलेल्या आवाहानमध्ये चंद्रकांत पाटील म्हणाले, कोरोना हा 8 आणि 15 दिवस टाळेबंदीने संपणार नाही. यापूर्वीही टाळेबंदी करण्यात आली आहेत. मात्र, परिस्थिती किंचित बदलली जरी असली तरी पुन्हा कोरोना डोकं वर काढत आहे. त्यासाठी आता प्रत्येक जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा आता अधिक भक्कम करणे गरजेचे आहे. एखादा रुग्ण आढळल्यास त्यानंतर लगेचच संपर्कात आलेल्या लोकांचे ट्रेसिंग करून त्यांची चाचणी घेणे गरजेचे आहे. त्यासाठी चांगल्या दर्जाचे टेस्टिंग किट उपलब्ध करून दिले पाहिजेत कारण राज्यात अनेकांना चाचण्यांवरही विश्वास नाही. काही ठिकाणी पॉझिटिव्ह तर काही ठिकाणी निगेटिव्ह अहवाल येत आहेत. त्यामुळे चांगल्या दर्जाचे टेस्टिंग किट तसेच टेस्टिंग लॅब सुद्धा उभे करणे गरजेचे आहे. सध्या लोक घरातच राहून उपचार घेत आहेत. असे न होता सौम्य लक्षण असलेल्या रुग्णांसाठी कोव्हिड सेंटर उभे करणे गरजेचे आहे. त्यासाठी स्वयंसेवी संस्थांनाही आवाहन करू शकता, असेही चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.
वैद्यकीय महाविद्यालयातील शेवटच्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची घ्यावी मदत
राज्यभरात अनेक ठिकाणी रुग्णालयात बेड उपलब्ध नाहीत. त्यामुळे कोव्हिड सेंटर सुरू करण्याची गरज आहे. शिवाय आता मेडिकल कॉलेजमध्ये शेवटच्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची यासाठी मदत घेणे गरजेचे असल्याचेही चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.
रेमडेसिवीर इंजेक्शनची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांकडे द्यावी
आता रेमडेसिवीर इंजेक्शन अनेक रुग्णांना वाचविण्यासाठी उपयोगी पडत आहे. सध्या राज्यभरात त्याची कमतरता भासत आहे. त्यामुळे नियोजन म्हणून प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांकडे याची जबाबदारी द्यावी. ज्या रुग्णालयाला रेमडेसिवीर इंजेक्शन हवे आहे त्यांनी चलन पाठवून इंजेक्शन घ्यावे, असे नियोजन केल्यास एकाच वेळी कोणीही साठा करून ठेवणार नाही तसेच टंचाई भासणार नाही, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.
आमदारांना वाढीव निधी न देता तो कोरोनासाठी वापरावा
अनेक जिल्ह्यात नादुरुस्त व्हेंटिलेटरची संख्याही प्रचंड आहे. संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी व्हेंटिलेटर दुरुस्तीबाबत माहीती घेऊन आरोग्य यंत्रणा सुरळीत करण्यास प्रयत्न करणे गरजेचे आहे, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले. शिवाय आमदारांच्या निधीलाही माझा विरोध नाही. मात्र, तो निधी आता कोव्हिडचे इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण करण्यासाठी द्यायला हवा. प्रत्येक आमदारांचे दोन कोटी असे जिल्ह्यातील 10 आमदार गृहीत धरले तर 20 कोटी होतात. त्यामध्ये आणखी प्रत्येकी 2 कोटी वाढ केल्यास 40 कोटीमध्ये अतिशय चांगल्या सुविधा सद्यस्थितीत उपलब्ध करून देऊ शकतो, असेही चंद्रकांत पाटील यांनी म्हणाले.
हेही वाचा - 'पंतप्रधानांना नोबेल द्या, पण लस निर्यात बंद करा'