कोल्हापूर - बुधवारी नाशिकच्या डॉ. जाकिर हुसेन हॉस्पिटलमध्ये ऑक्सीजन गळतीमुळे तब्बल 24 रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर संपूर्ण राज्यभरासह देशभरातून विविध प्रतिक्रिया आल्या. शिवाय मोठा हलगर्जीपणा सुद्धा समोर आला. याबाबत चौकशीचे आदेश सुद्धा देण्यात आले आहेत. कोल्हापुरातील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात सुद्धा तब्बल 20 हजार लीटर क्षमतेची ऑक्सिजनची टाकी बसविण्यात आली आहे. याठिकाणी कशापद्धतीने काळजी घेतली जाते, ज्या ठिकाणी टाकी आहे, त्याठिकाणी काही टेक्निशियन आहेत का, याबाबत आढावा 'ईटीव्ही भारत'ने घेतला.
20 हजार लीटर क्षमतेची लिक्विड ऑक्सिजन टाकी -
तीस फूट उंच दोन मीटर व्यास असलेली ही लिक्विड ऑक्सिजन टाकी गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात बसविण्यात आली. यासोबतच 400 क्यूबिक मीटर प्रतितास क्षमतेचा वेपोरायझरही बसविण्यात आला आहे. 20 हजार लीटर क्षमतेची ही टाकी आहे. या टाकीमधून सीपीआरमधील 17 ठिकाणी असणाऱ्या ऑक्सिजन बँकमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा केला जात आहे. तेथून पाईपलाईनद्वारे रुग्णांच्या खाटापर्यंत ऑक्सीजन सुविधा देण्यात आली आहे. गेल्या वर्षभरापासून कोणत्याही पद्धतीने याठिकाणी अडचण किंव्हा दोष आढळला नाही.
देखरेखीसाठी नेमले टेक्निशियन -
या लिक्विड ऑक्सिजन टाकीच्या देखरेखीसाठी टेक्निशियनची टीम सुद्धा बनवण्यात आली आहे. त्याद्वारे दररोज टाकीची पाहणी केली जाते. जेव्हा टाकीमध्ये ऑक्सिजन भरण्यासाठी टँकर येतो, तेव्हा सुद्धा नीट काळजी घेतली जाते. कुठे लिकेज होत नाही ना, याची सुद्धा काळजी घेतली जाते, अशी माहिती येथील टेक्निशियन कृष्णात कारंडे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली. शिवाय काही तांत्रिक बिघाड झालाच,तर जम्बो सिलेंडर सुद्धा राखीव ठेवण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली.
कोल्हापूरातील आयजीएम रुग्णालयात सुद्धा अशाच पद्धतीची टाकी -
छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात 20 हजार लीटर लिक्विड ऑक्सिजन टाकी बसविल्यानंतर इचलकरंजी येथील आयजीएम रुग्णालयात सुद्धा 6 हजार लीटर क्षमतेची ऑक्सीजन टाकी बसवण्यात आली. या टाकीमुळे सुद्धा जवळपास 200 हून अधिक रुग्णांच्या ऑक्सिजनची सोय झाली आहे. या टाकीची उंची जवळपास 17 फूट असून त्याचा व्यास 2 मीटर इतका आहे. त्याठिकाणी सुद्धा टेक्निशियन नेमण्यात आले असून योग्य पद्धतीने ऑक्सिजन पुरवठा होईल, याची काळजी घेतली जाते.
हेही वाचा - ऑक्सिजन गळती प्रकरणाचा तपास करण्यासाठी उच्चस्तरीय समिती - आरोग्य मंत्री राजेश टोपे