कोल्हापूर - माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर सीबीआयचा छापा म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे. अनिल देशमुख यातून निर्दोष सुटतील असा मला विश्वास आहे. राजकीय हेतू डोळ्यासमोर ठेऊन ईडी, सीबीआय यांचा वापर केला जात आहे. भाजपाकडून सरकार अस्थिर करण्याचा हा प्रयत्न आहे, यामध्ये ते कदापिही यशस्वी होणार नाहीत असे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हंटले आहे. ते कोल्हापूरमध्ये बोलत होते.
अनिल देशमुख यांच्या मालमत्तेवर छापा
पुढे बोलताना ते म्हणाले की, एका पत्राच्या आधारे एवढी मोठी कारवाई होऊ शकते का? लवकरच 'दूध का दूध और पानी का पानी' होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. दरम्यान माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरी सीबीआयचा छापा पडला असून, देशमुखांचे घर आणि इतर मालमत्तांवर छापे टाकण्यात आले आहेत. मुंबईसह इतर १० ठिकाणांवरील देशमुख यांच्या मालमत्तांवर छापे टाकण्यात आले आहेत. यावर प्रतिक्रिया देताना हसन मुश्रीफ यांनी भाजपावर जोरदार निशाणा साधला आहे.
हेही वाचा - मुंबई पोलिसांनी वाहनांवरील कलर कोडचे नियम केले रद्द