कोल्हापूर - रांगोळी गावात पूरग्रस्तांना दिलेले पैसे पोलीस बंदोबस्तात पुन्हा वसूल करण्याचा प्रकार घडलाय. घडलेल्या या प्रकारामुळे नागरिक संतप्त झाले आहेत. त्यामुळे, गावात तणावाचे वातावरण आहे. पूरग्रस्त कोण हेच प्रशासनाला समजले नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
जिल्ह्यातील महापुराचा फटका हातकणंगले तालुक्यातील रांगोळी गावाला सुद्धा मोठ्या प्रमाणात बसला होता. त्यानंतर, 100 टक्के गाव पूरग्रस्त घोषित करत, सर्वांना प्रत्येकी ५ हजारांचे सानुग्रह अनुदान वाटप करण्यात आले. मात्र, त्यानंतर पूरग्रस्त आणि पूरबाधित या शब्दरचनेत प्रशासन अडकल्याने हे पैसे पुन्हा वसूल करण्यात आले. त्यामुळे, मदत म्हणून मिळालेल्या अनुदानाची पोलीसांकडून वसूली झाल्याने नागरिक संतप्त झाले आहेत.
प्रशासनाने कोणतेही सर्वेक्षण न करता ही मदत दिल्याने गोंधळ उडाल्याची चूक कबूल केली आहे. आता पुन्हा सर्वेक्षण करून मग मदत देऊ, असे सरकारी उत्तर अधिकारी देत आहेत. प्रशासनाच्या चुकीच्या कामकाजाचा फटका मात्र नागरिकांना सहन करावा लागत आहे. पूरग्रस्त भागात मनमानी पद्धतीने जर निधीचे वाटप होत असेल, तर त्यावर कोणाचा तरी अंकुश हवा. नाहीतर, यामध्ये पूरग्रस्तांच्या टाळूवरचे लोणीही लोक खाऊन घेतील यात शंका नाही.