कोल्हापूर- अंबाबाई देवीचे दुर्मीळ दागिने भक्तांना पाहता यावे यासाठी देवीच्या मौल्यवान दागिन्यांचे लवकरच संग्रहालय करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे दागिने केवळ दोनच दिवस भक्तांना पाहण्यासाठी खुले करण्यात येणार असल्याची माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी दिली आहे. अंबाबाई मंदिरातील गरुड मंडपात देवीचे मौल्यवान दागिने भक्तांना पाहण्यासाठी ठेवले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
देवीच्या मौल्यवान खजिन्यात रत्नजडित किरीट, हिर्याची नथ, मोहरांची माळ, कवड्यांची माळ, श्रीयंत्र हार, जडावाची मयूर कुंडले, सोन्याचा किरीट, 16 पदरी चंद्रहार, 84 मण्यांचा लफ्फा, मोरपक्षी असे अनेक दुर्मीळ अलंकार आहेत. पुराण काळापासून देवीला अर्पण केलेल्या सोन्याच्या नाण्यांचाही या संग्रहालयात समावेश असणार आहे. दागिन्यांचे नक्षीकाम, त्यामध्ये वापरलेली रत्ने, मोती अत्यंत सुबक बनावटीचे असून, सद्यःस्थितीत असे दागिने पाहायला मिळणे हीच मोठी गोष्ट आहे.
सध्या मंदिरातील गरुड मंडपात सुवर्ण पालखी ज्या ठिकाणी ठेवण्यात आली आहे त्या ठिकाणीच हे सर्व दागिने भक्तांना पाहण्यासाठी ठेवले जाणार आहेत. यासाठी मंदीराची अंर्तबाह्य सुरक्षा वाढवण्यात येणार आहे. तसेच गरुड मंडपाला सुद्धा अद्ययावत सुरक्षा यंत्रणेमार्फत कडेकोट बंदोबस्त देण्यात येणार आहे, असे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी यावेळी सांगितले.