कोल्हापूर- अखिल भारतीय चित्रपट महामंडळातील घोळ आणि वाद काही संपण्याची चिन्हे नाहीत. महामंडळाच्या उपाध्यक्ष धनाजी यमकर यांनी अध्यक्ष मेघराज भोसले यांच्यावर धनादेश चोरीसह धान्यवाटपाच्या घोळाचे आरोप केले आहेत. त्यांच्यासह सर्व पदाधिकांऱ्यावर कारवाई करावी, अशी मागणी उपाध्यक्ष यमकर यांनी केली आहे.
अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या उपाध्यक्ष धनाजी यमकर म्हणाले, गेल्या वर्षभरात अध्यक्ष भोसले हे मनमानी करत आहेत. टाळेबंदीच्या काळात त्यांनी धान्यवाटप व धनादेश चोरीचे प्रकरण केले आहे. तसेच चित्रपट महामंडळासारखी शिखर संस्था महाकला मंडळाच्या घशात घालत असल्याचा आरोपही धनाजी यमकर यांनी केला आहे.
चित्रपट महामंडळात यापूर्वी कोणत्याच घटना घडल्या नाहीत. मात्र ५४ वर्षाच्या कालावधीत प्रथमच अध्यक्षावर उघड उघड आरोप केले जातात. हे बरोबर नाही. अध्यक्ष भोसले यांनी महामंडळासाठी आतापर्यंत काय केले? असा सवाल महामंडळाचे माजी अध्यक्ष व अभिनेते विजय पाटकर यांनी केला.
उपाध्यक्ष धनाजी यमकर यांनी हे केले आरोप-
१) लॉकडाउन काळात सभासदांना धान्य वाटप करण्यात आले. त्याचे प्रकरण उपाध्यक्ष यमकर यांनी उघड केले. मात्र दबाव टाकला जात असल्याचा आरोप उपाध्यक्ष धनाजी यमकर यांनी केला.
२) अध्यक्ष भोसले यांनी माझ्यावर धनादेशचोरीचा आरोप केला. मात्र प्रमुख व्यवस्थापक नसताना पेन्सिलने भरलेला चेक त्यांनी माझ्या नावे भरला. याची रीतसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांच्याकडे दाद मगितल्यावर त्यांनी प्रतिसाद दिला नसल्याचे उपाध्यक्ष यमकर यांनी सांगितले.
3)चित्रपट महामंडळाला ५४ वर्षाची परंपरा आहे. चित्रपटांची मातृसंस्था असताना अध्यक्ष भोसले यांनी मनमानी पद्धतीने महाकला मंडळात सामील केले. याला कोणत्याही संचालकांची परवानगी नाही.
तीन वर्षानंतर महामंडळाला सोहळ्यासाठी मुहूर्त-
अखिल भारतीय चित्रपट महामंडळातर्फे चित्रभूषण आणि चित्रकर्मी पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले, लीला गांधी आणि सुषमा शिरोमणी यांना चित्रभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. मागील ३ वर्षांपासून रखडलेल्या पुरस्कार सोहळ्यासाठी महामंडळाला यंदा मुहूर्त सापडला होता.