कोल्हापूर - लॉकडाऊनमुळे मंडप, डेकोरेशन व्यवसायिक डबघाईला आले आहेत. या व्यावसायिकांना उभारी देण्यासाठी राज्य शासनाने सार्वजनिक कार्यक्रमात ५०० लोकांच्या उपस्थितीला परवानगी द्यावी या आणि इतर काही मागण्यांसाठी आज कोल्हापुरात मंडप व डेकोरेशन व्यावसायिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. त्यांनी जिल्हा प्रशासनाला मागण्यांचे निवेदन दिले.
व्यावसायिक आर्थिक संकटात -
कोरोनामुळे सर्व व्यावसायिकांना मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागत आहे. कोरोनामुळे सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक व राजकीय कार्यक्रमांना स्थगिती दिली गेली आहे. त्यामुळे या कार्यक्रमांशी संबंधित असणाऱ्या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. या क्षेत्रात असणाऱ्या कर्मचाऱ्यांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अनेकांनी मानसिक तणावाखाली येऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे प्रकारही घडत आहेत. त्यामुळे शासनाने तत्काळ व्यवसायासाठी परवानगी द्यावी या मागणीसाठी आज कोल्हापुरात मोर्चा काढला आहे. कोल्हापुरातील दसरा चौक येथून हा मोर्चा जिल्हाधिकार्यालयावर धडकला. हा मोर्चा 'ऑल महाराष्ट्र टेंट डीलर्स ऑर्गनायझेशन'च्या नेतृत्वाखाली काढण्यात आला.
आठ महिन्यात झाल्या १७ आत्महत्या -
लॉकडाऊनमुळे सर्वच व्यवसायांवर परिणाम झाल्यामुळे हातावर पोट असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. या व्यवसायातील राज्यात आतापर्यंत १७ जणांनी आत्महत्या केल्या आहेत. कोल्हापुरातही एकाने आत्महत्या केल्याचे डेकोरेटर्स संघटनेचे जिल्हाध्यक्ष सागर चव्हाण यांनी सांगितले.
प्रमुख मागण्या -
- मंडप, लॉन, मंगल कार्यालये, हॉलच्या क्षमतेपैकी पन्नास टक्के आसन क्षमतेला परवानगी देण्यात यावी.
- व्यवसायासंदर्भातील जीएसटी 18 टक्क्यांवरून पाच टक्क्यांवर आणावा.
- भाड्याचे गोदाम असणाऱ्यांचे भाडे माफ करावे.
- कर्जदारांचे व्याज माफ करावे व स्थिती सामान्य होईपर्यंत ईएमआय स्थगित करावेत.
- सर्व मंडप व्यवसाय धारकांना उद्योगाचा दर्जा दिला जावा.
- सार्वजनिक कार्यक्रमांसंदर्भातील सर्व व्यवसाय धारकांनी घेतलेल्या कर्जावर सबसिडीची तरतूद करावी.