भोकरदन (जालना) - तालुक्यातील इब्राहिमपूर येथील एका तरुणीचा शेततळ्यात पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. भोकरदन शहरापासून चार किलोमीटर अंतर असलेल्या इब्राहिमपूर येथील शेतात डोभाळ कुटुंब राहते. त्यांची मुलगी पूजा सिधुसिंग डोभाळ (वय २०) ही बीडीएसच्या द्वितीय वर्षात औरंगाबाद येथे शिकत होती. टाळेबंदीनंतर ती घरीच होती. 4 जानेवारी रोजी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास शेत तलावावर गेली होती. तलावावरून चालत असताना पूजाचा पाय घसरला आणि ती शेततळ्यात पडली.
सोबतच्या महिलेने आरडाओरडा केला, मात्र या ठिकाणी कोणी पुरुष नव्हते. त्यामुळे पूजाचा शेततळ्यातील पाण्यात बुडून मृत्यू झाला. त्यानंतर नागरिकांनी धावपळ करून तिला गळ टाकून पाण्याबाहेर काढले, मात्र तोपर्यंत पूजाचा मृत्यू झाला होता. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक भागवत नागरगोजे यांनी दाखल होऊन पंचनामा करून आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पूजा ही भोकरदन येथील उद्योजक महादुसिंग डोभाळ यांची पुतणी होती. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केला जात आहे.
पूजाचे डॉक्टर बनण्याचे स्वप्न अपूर्णच
पूजा औरंगाबाद येथे बीडीएसचे शिक्षण घेत होती. तिला डॉक्टर बनायचे होते. त्यामुळे ती सतत अभ्यास करीत होती; परंतु सोमवारी दुर्दैवी मृत्यू झाल्याने तिचे डॉक्टर बनण्याचे स्वप्न अपूर्णच राहिल्याचे नातेवाईकांनी सांगितले. तिच्या पार्थिवावर इब्राहिमपूर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. तिच्या पश्चात आई-वडील, दोन भाऊ, बहीण, दोन काका असा परिवार आहे.
आजारी वडिलांना दवाखान्यात कळली घटना
पूजाचे वडील हे नेहमीच आजारी असतात. ते सोमवारी तपासणीसाठी औरंगाबाद येथे गेले होते. दवाखान्यात पाय ठेवताच सिधूसिंग डोभाळ यांना मुलगी शेततळ्यात पडल्याची माहिती मिळाली. त्यांनी दवाखाना सोडून तशीच इब्राहिमपूरकडे धाव घेतली. घरी आल्यानंतर मुलीचा मृत्यू झाल्याचे त्यांना कळाले. पूजाचे एक काका रविवारीच पुण्याला गेले होते. दुसरे काका जिनिंगला गेले होते.