जालना - भर रस्त्यावर उभे राहून तलवारीने वाढदिवसाचा केक कापणे एकाला चांगलेच महागात पडले आहे. रेल्वे स्टेशन रस्त्यावरील पोस्ट ऑफिसजवळ काल (सोमवार) तीन तरुण तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा करत होते. त्याचवेळी जालना पोलीस ठाण्याचे कर्मचारी त्याठिकाणी पोहचले. त्यांनी या तिघांनाही ताब्यात घेतले. परिणामी या तरुणांना वाढदिवसाच्या दिवशीच पोलीस ठाण्यात जावे लागले.
दोन फूट तलवारीने कापला केक -
पंकज भट्ट साबळे (वय 25, म्हाडा कॉलनी, जुना जालना), आकाश विनोद गमरे(वय 25, जालना), संदेश लक्ष्मण जगताप (वय 20 ठाणेपाडा, जि. नंदुरबार) हे तिघेजण सोमवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास रेल्वे स्टेशन रस्त्यावर असलेल्या पोस्ट ऑफिस समोर वाढदिवस साजरा करत होते. मोटरसायकलवर केक ठेवून दोन फूट तलवारीने हा केक कापला जात होता. त्याच वेळी कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस तिथे पोहोचले.
तरुणांवर गुन्हा दाखल -
तिघा तरुणांना त्यांच्या दोन दुचाकीसह पोलिसांनी पोलीस ठाण्यात नेले. तिथे त्यांच्यावर जिल्हाधिकाऱ्यांच्या आपत्ती व्यवस्थापन आदेशाचे उल्लंघन, सार्वजनिक ठिकाणी प्राणघातक शस्त्र बाळगल्याच्या कारणाने गुन्हा दाखल करण्यात आला.