जालना - जिल्हा परिषदेच्या उर्वरित 170 शिक्षकांच्या शुक्रवारी समुपदेशनाद्वारे बदल्या करण्यात आल्या. त्यामुळे "जो जे वांछील तो ते लाहो" अशा पद्धतीने, ऑनलाईन झालेल्या बदल्यांमुळे शिक्षण विभागातील घोडेबाजाराला आळा बसला आहे.
वर्षानुवर्ष पदाधिकाऱ्याला हाताशी धरून एके ठिकाणी ठाण मांडणाऱया शिक्षकांना आणि पाहिजे ते ठिकाण मिळावे म्हणून राजकारण करण्यासाठी विविध संघटना उदयास असणार्या शिक्षकांच्या संघटनेलाही या प्रकारामुळे आळा बसला आहे.
जालना जिल्हा परिषदेच्या कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात शुक्रवारी सकाळी साडे नऊ वाजल्यापासूनच बदल्यांच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती निमा अरोरा यांनी स्वतः सभागृहात ठाण मांडून शिक्षकांच्या या ऑनलाईन बदल्यांची प्रक्रिया पूर्ण केली. त्यांच्यासोबत उपमुख्य कार्यकारी अधिकारी केंद्रेकर, शिक्षणाधिकारी पांडुरंग कवने, कैलास दातखिळे, रवी जोशी यांचीही उपस्थिती होती.
जिल्ह्यामध्ये अनेक शाळांवर गरज नसतानाही दोन दोन शिक्षक कार्यरत होते. तर दुसरीकडे शिक्षक नसल्यामुळे शाळा बंद पडण्याची वेळ आली होती. त्यामुळे अतिरिक्त शिक्षकांना रिक्त ठिकाणांची माहिती दिल्यानंतर ज्या शिक्षकाला अतिरिक्त ठिकाण सोयीस्कर असेल त्याने ते मागून घेतले आहे. त्यामुळे बदल्यांसाठी 10 हजारांवरून 50 हजारापर्यंतचा होणारा घोडेबाजार या ऑनलाइन पद्धतीमुळे बंद झाला आहे. त्याचाच परिणाम म्हणून आज या सभागृहामध्ये एकही लोकप्रतिनिधी किंवा पदाधिकारी उपस्थित नव्हते. दरम्यान जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सतीश टोपे यांनी सकाळी सभागृहात हजेरी लावून काढता पाय घेतला.