जालना - सध्या लॉकडाऊन असतानाही जालना शहरात विनाकारण फिरणाऱ्यांची गर्दी मोठी आहे. सकाळी अकरा वाजेपर्यंत जीवनावश्यक वस्तूंचे व्यवसाय आणि उद्योग करण्यास परवानगी आहे, मात्र अकरा नंतर देखील अनेक वाहनधारक विनाकारण रस्त्यांवर गर्दी करत आहेत. याला आळा घालण्यासाठी आज सदर बाजार पोलीस आणि कदीम जालना पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी केली व दंड वसूल केला.
हेही वाचा - ऑक्सीजन सिलिंडरचा अवैध साठा; 'त्याचा' परवाना रद्द करण्याचे आदेश
नवीन जालन्यात पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी मामा चौकात नाकाबंदी करून वाहनचालकांकडून दंड वसूल केला, तर जुना जालना भागात अंबड चौफुली येथे कदीम जालना पोलिसांनी नाकाबंदी केली होती. या नाकाबंदी मध्ये पोलिसांनी वाहन चालकांना अडवून विनाकारण फिरण्याचे कारण विचारले, तसेच वाहनाला नंबर नसणे, वाहन चालकाकडे परवाना नसणे या सर्व बाबींची कसून तपासणी केली. या कारवाईमुळे विनाकारण फिरणाऱ्या वाहन धारकांना आळा बसेल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला.
हेही वाचा - जालन्यात राजीव सातव यांच्या पार्थिवावर पुष्पवृष्टी