बदनापूर (जालना) - चिखली येथून अवैधरित्या दोन घरात साठवलेला 27 हजार 970 रुपयांचा देशी-विदेशी दारूचा साठा बदनापूर पोलिसांच्या पथकाने शोधून काढला आहे. या प्रकरणी दोन जणांविरुद्ध रविवारी रात्री उशिरा बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बदनापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक मारुती खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी अवैध दारूविक्रीच्या अड्ड्यांवर छापेमारी करण्याची धडक मोहीम सुरू केली आहे. त्यामुळे अवैध दारूविक्रेत्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. कोरोना संकटामुळे पोलीस, आरोग्य विभाग रात्र दिवस परिश्रम घेत आहे. याचा अवैधरित्या व्यवसाय करणारी मंडळी घेत असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत आहे.
दोन दिवसापूर्वी खामगाव येथे एका किराणा तर एका पिठाच्या गिरणीमध्ये दारू विक्री होत असल्याचा प्रकार समोर आला होता. तसेच चिखली येथे संशयित सुशीलाबाई गणेशलाल जैस्वाल आणि अक्षय मदनलाल जैस्वाल यांनी आपापल्या घरात अवैध विक्रीसाठी देशी - विदेशी दारूचा साठा दडवल्याची माहिती पोलीस निरीक्षक एम.बी. खेडकर यांना मिळाली होती. त्या आधारावर त्यांनी स्वतःच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक गजानन जारवाल, पोलीस जमादार गजानन बहुरे, महिला पोलीस कर्मचारी पूजा बडगुजर, गृहरक्षक दलाचे जवान पवार आणि शिंदे यांचा समावेश असलेल्या पथकासह छापा मारला.
या कारवाईत सुशिलाबाई जैस्वाल यांच्या घरात ठेवलेल्या देशी दारूच्या 68 बाटल्या, विदेशी दारूच्या 122 बाटल्या असा एकूण 17 हजार 938 रुपयांचा अवैध दारूचा साठा जप्त केला. मात्र, संशयित सुशिलाबाई पोलिसांचा सुगावा लागताच फरार झाली. तर संशयित अक्षय मदनलाल जैस्वाल यांच्या घराची पोलिसांच्या पथकाने झडती घेतली असता त्यात देशी दारूच्या 106 बाटल्या व विदेशी दारूच्या 28 बाटल्या, असा एकूण 10 हजार 32 रुपयांचा साठा आढळला. अक्षय जैस्वाल यास ताब्यात घेण्यात आले आहे. या दोघांकडून एकूण 27 हजार 970 रुपयांचा साठा जप्त करण्यात आल्याची माहिती, पोलीस नाईक गजानन जारवाल, गजानन बहुरे यांनी दिली.