जालना - कोविड-१९ या शासकीय रुग्णालयात जीवाची बाजी लावून काम करत असलेल्या डॉक्टर्स, परिचारिका, स्वच्छता कामगार आदी कर्मचाऱ्यांचा जालना जिल्हा शिवसेनेकडून भेटवस्तू देऊन आज सत्कार करण्यात आला. माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर, जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर यांच्यासह शिवसेनेच्या अन्य पदाधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती.
याच कार्यक्रमात कोरोनाच्या रुग्णांना तंदुरुस्त करण्यामध्ये महत्त्वाची कामगिरी बजावणाऱ्या आणि कोरोना विभागाचे प्रमुख असलेल्या डॉ. जगताप, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय कुलकर्णी, यांच्यासह डॉक्टर संजय राख, डॉ. बी. बी. चव्हाण, भाले यांचाही पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर यांनी केले.
यावेळी आंबेकर म्हणाले, की जालना जिल्ह्यामध्ये कोरोनाच्या रुग्णांना आळा घालण्यामध्ये आरोग्य विभागाचा मोलाचा वाटा आहे. जीवाची बाजी लावून, जीवावर उदार होऊन अशा ठिकाणी काम करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा सत्कार करून त्यांचे मनोधैर्य वाढविणे ही सामाजिक बांधिलकी आहे आणि हे काम शिवसेना करत आहे.