जालना- जिल्ह्यात कोरोनाबधित रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. आज सकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार 17 रुग्ण वाढले आहेत. या 17 रुग्णांमध्ये जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी येथील 9, अंबड शहर एक जालना शहरामधील 7 रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या 378 पर्यंत गेली आहे. आतापर्यंत 11 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे.
6 एप्रिल रोजी जालना जिल्ह्यामध्ये एक महिला कोरोनाबाधित आढळून आली होती. ती जिल्ह्यातील पहिली कोरोनाबाधित रुग्ण होती.त्यानंतर कोरोनाची बाधित रुग्ण सापडण्याची गती खूप मंदावली होती. मात्र, गेल्या महिन्याभरात मध्ये लॉकडाऊनमध्ये शिथिलता आल्यानंतर रुग्णांच्या संख्येमध्ये झपाट्याने वाढ होत आहे.
शहरातील मुख्य रुग्णालयांमध्ये ,सामान्य रुग्णालयात देखील या कोरोनाचा शिरकाव झाला आहे. त्यामुळे गर्दीला आळा घालण्यासाठी व्यापाऱ्यांनी देखील पुढे होऊन तीन दिवसांचा जनता कर्फ्यू लागू केला होता. हा कर्फ्यू यशस्वी झाला आहे. आज कर्फ्यू उठल्यानंतर शहरांमध्ये काय परिस्थिती असणार आहे, हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.
कोरोना संदर्भात जालना जिल्ह्याची आज सकाळी आठ वाजेपर्यंतची अशी परिस्थिती आहे.
आत्तापर्यंत एकूण रुग्ण- 378
बरे होऊन घरी गेलेले रुग्ण -245
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण -122
कोरोनामुळे मृत्यू झालेले रुग्ण- 11