बदनापूर (जालना) - एका दाखल असलेल्या गुन्ह्यात अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर वाळू माफियाने जीवघेणा हल्ला केल्याची घटना गुरुवारी रात्री उशिरा बदनापूर येथे घडली. याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असून इतर आरोपी फरार आहेत. शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परमेश्वर शिवराम माताडे, असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. बदनापूर तालुक्यातील कुंभारी येथील संजय ओंकार उगले विरुद्ध बदनापूर पोलीस ठाण्यात तीन महिन्यापूर्वी गावातील एका व्यक्तीस जीवे मारण्याचा प्रयत्न केला म्हणून कलम ३०७ अन्वये गुन्हा दाखल झालेला आहे. तेव्हापासून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. मात्र, तो हाती लागला नव्हता. विशेष म्हणजे हा आरोपी वाळू माफिया असून बिनधास्तपणे वाळूचा व्यवसाय करत आहे. तो गावात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदाम भागवत हे आपल्या इतर कर्मचाऱ्यासोबत २ जुलैला साडेचार वाजता कुंभारी येथे त्याला अटक करण्यासाठी गेले. आरोपीला सुगावा लागल्याने त्याने देवपिंपळगाव ते कुंभारी रस्त्यावर सहाय्यक पोलीस निरीक्षकांसह त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या अंगावर वेगाने वाहन चालवून नेत त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्याच्यासोबत त्याचे साथीदार परमेश्वर माताडे, नावा इंगळे व शुभम होते. पोलिसांनी आरोपींचा पाठलाग केला असता संजय उगले व इतरांनी पळ काढला. मात्र, परमेश्वर माताडेला पकडण्यात पोलिसांना यश आले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक मारुती खेडकर यांनी घटनास्थळी भेट दिली. तसेच फरार आरोपींचा शोध घएणे सुरू आहे.