जालना - पोलीस यंत्रणा एखाद्या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी कोणत्या दिशेने चक्रे फिरतील याचा काही नेम नाही. असाच एक तपास सदर बाजार पोलिसांनी लावला आहे. या कामामध्ये करिझ्मा या दुचाकीचा त्यांना फायदा झाला आहे.
अशी घडली घटना
सदर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या पाणीवेस येथील रस्त्यावरून आदित्यराज भरत जांगडे हा 20 वर्षीय तरुण 22 जानेवारीला रात्री 10 वाजेच्या सुमारास शिवाजी पुतळ्याकडे जात होता. चार चाकी क्रमांक एम एच 21 एक्स 19 40 या वाहनातून जात असताना समोरच असलेल्या एका करिझ्मा या दुचाकीला या कारचा धक्का लागला. त्यानंतर या दुचाकीवरील तिघांनी जांगडे याला मारहाण करत पोते उचलण्यासाठी वापरण्यात येत असलेल्या आकुडीने अंगावर जखमा केल्या, गाडीच्या काचा फोडल्या आणि आरोपी फरार झाले. याप्रकरणी आदित्यराज जांगडे यांच्या तक्रारीवरून सदर बाजार पोलिस ठाण्यात दिनांक 23 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
असा लावला तपास
तक्रारदाराने तक्रार देताना दुचाकीचा कोणताही नंबर दिला नव्हता किंवा आरोपीची ओळखी सांगितली नव्हती, मात्र फक्त पिवळ्या रंगाच्या करिझ्मा दुचाकीवरून आलेल्या तिघांनी मारहाण केल्याचे सांगितले होते. त्यानंतर सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी हा तपास सदर बाजार पोलीस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल परशुराम पवार यांच्याकडे दिला. वाहनाचा नंबर आणि अधिकची माहिती काहीच नसल्याने पवार यांनी सहा दिवस जालना शहरातील करिझ्मा दुचाकीचा वापर करणाऱ्या मालकांचा शोध घेतला. त्यामध्ये तक्रारदाराने सांगितलेल्या पिवळ्या रंगाच्या सहा करिझ्मा दुचाकी शोधल्या, मात्र अपघाताचा आणि या वाहनांचा काहीच संबंध जुळत नसल्याचे लक्षात आले. खरेतर ही करिझ्मा लाल रंगाची होती त्यामुळे पुन्हा एकदा सर्वच करिझ्मा कंपन्याचे वाहने तपासले असता ही सातवी दुचाकी सापडली. याविषयी अधिक माहिती घेतल्यानंतर ही दुचाकी चालविणारे शेख बाबु शेख नजीर 26, युनुस रफिक पठाण 22 ,आणि अजहर शेख 20, राहणार रहमानिया मज्जित समोर ,गांधीनगर जालना हे वापरत असल्याचे कळाले . जालन्यात शोध घेऊनही ते सापडले नाहीत .त्यामुळे अधिकचा तपास करीत असताना जालना तालुक्यातील सिंधी काळेगाव येथे हे गेल्या पाच-सहा दिवसांपासून ते लपून बसले असल्याची माहिती परशुराम पवार यांना मिळाली.
केवळ या करिझ्मा कंपनीच्या वाहनावरून पवार यांनी या तिघांनाही ताब्यात घेतले आणि चौकशी केली . फिर्यादीने देखील या तिघांना ओळखले आणि आरोपींनी देखील हा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे.